राहुरी शहर विकासावर दादासोनवणेचा पलटवार; भाजपाने तनपुरे गटाला उत्तर दिले Pudhari
अहिल्यानगर

Rahuri city development BJP response: राहुरी शहर विकासावर दादासोनवणेचा पलटवार; भाजपाने तनपुरे गटाला उत्तर दिले

40 वर्षे सत्तेत राहूनही विकास न केल्याचा आरोप; 132 कोटींच्या भुयारी गटार योजनेसह स्मार्ट सिटी प्रकल्पावर प्रकाश टाकला

पुढारी वृत्तसेवा

राहुरी : नगरपालिकेमध्ये 40 वर्षांपासून सत्ता असताना तसेच पंचवीस वर्ष आमदारकी व अडीच वर्ष राज्यमंत्रीपद असताना विकास करता आला नाही, त्यांनी आम्ही सामान्य जनतेसाठी काम करत असताना ‌‘सोंगाड्या‌’ हा शब्द वापरणे चुकीचे असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते दादापाटील सोनवणे व भाजपा मंडळ तालुकाध्यक्ष विक्रम भुजाडी यांनी पत्रकार परिषदेत केला.(Latest Ahilyanagar News)

राहुरी शहरातील विकास कामांबाबत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आ.शिवाजीराव कर्डिले तसेच भाजपा कार्यकर्त्यांवर आरोप केले होते, या आरोपांना भाजपा कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे.

दादापाटील सोनवणे व विक्रम भुजाडी म्हणाले की, राहुरी शहराच्या विकासाकरिता आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन आ.शिवाजीराव कर्डिले, माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी शहरासाठी मिळविला. राहुरी शहरात 132 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना आम्ही आणली. प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला आम्हीच मंजुरी मिळविली.

आता शंभर कोटी रुपये विकास कामांचा आराखडा तयार करण्यात येत असून राहुरी शहराला स्मार्ट सिटी म्हणून पुढे नेण्याची वल्गना करणाऱ्यांनी काय काम केले असा सवाल उपस्थित केला. कोरोना काळात कोणी रेमडीसीवर इंजेक्शन विक्रीमध्ये किती पैसे कमवले हे शहरातील जनतेला माहिती आहे. जॉगिंग ट्रॅकचे काम अर्धवट असताना कोणाच्या सांगण्यावरून बिले काढली गेली हे देखील जनतेला माहिती आहे.

आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो तसेच तुम्ही देखील नगरसेवक म्हणून निवडून आले आम्ही सोंगाड्या झालो तर तुम्ही देखील सोंगाड्या आहेत. आमदार कर्डिले यांचे मणक्याचे ऑपरेशन झालेले असताना जनसंपर्क होत नव्हता त्यावेळी चुकीची माहिती पसरविण्यात आली. परंतु आ.कर्डिले आता सक्रिय झाल्याने यांना भविष्याची चिंता लागली आहे. विखे-कर्डिले यांच्या माध्यमातून राहुरी शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे देखील सोनवणे व भुजाडी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी नगरसेवक अक्षय तनपुरे, शिवाजी डौले, सचिन मेहेत्रे, सुजय काळे, गणेश खैरे,अजित डावखर, किशोर येवले, उमेश शेळके, रविंद्र येवले, यांच्यासह भाजपाचे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT