राहुरी: बारागाव नांदूर गावामध्ये 111 फूट उंचीचा उभारलेल्या शिवस्वराज्य ध्वजालगत बांधकाम करण्यावरून दोन गटात सुरू असलेला वाद अखेर सर्वधर्मियांच्या सलोख्याने मिटला. लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे यांनी पुढाकार घेत गावाची एकी अबाधित ठेवा, असे आवाहन केले होते. त्यास सर्व धर्मियांनी प्रतिसाद देत झेंड्याचा वाद संपुष्टात आणल्याने विशेष ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. (Ahilyanagar News Update)
बारागाव नांदूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 111 फूट उंचीचा शिवस्वराज्य ध्वज लोकवर्गणीतून उभारण्यात आला. ध्वज उभारणी करणारे तरुण व शेजारील दुकानदार यांच्यात मतांतर झाले. बांधकाम झाल्यानंतर आमचा व्यवसाय बंद पडेल, अशी भावना मांडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. यावर ग्रामसभा घेत ध्वजलगत बांधकाम करण्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले. वादग्रस्त सभा होईल, अशी चर्चा होत असतानाच सभेच्या पूर्वसंध्येला गावातील सर्वधर्मिय प्रमुखांनी एकत्र येत बैठक घेतली.
लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाडे यांनी गावात सलोखा राखण्याचे आवाहन केले. सेवा संस्थेचे संचालक शंकर (बंडू) गाडे यांनी चर्चा घडवून आणली. ग्रामसभेपूर्वीच ध्वज लगत चारही बाजुंनी 3 फूट बांधकाम करण्यास अनुमती देण्यात आली. 3 बाय 3 असे बांधकाम करून देण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. सरपंच गाडे यांच्या आवाहनास सर्व ग्रामस्थांनी होकार दिला. गावच्या ग्रामसभेतही हा निर्णय झाला. सरपंच गाडे, इम्रान देशमुख, सुलतान पठाण, माजी जि.प.सदस्य धनराज गाडे यांनी आपले मत मांडत झेंड्याचा वाद संपुष्टात आल्याचे सांगितले. त्यानंतर गावातील विकास कामांबाबत चर्चा झाली. सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार, कैलास पवार, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, राजेंद्र घाडगे यांनी आपले मत व्यक्त करीत गावातील विकासात्मक बाबी तसेच समस्यांबाबत सर्वांनी एकी ठेवावी. गावाच्या समस्या संपुष्टात येण्यासाठी गट-तट विसरत विकास कामावर चर्चा करावी, असे आवाहन केले.
तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजीराजे पवार यांनी गावातील पाणी पुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गावातील अतिक्रमण, रस्त्यावर चिखलाचा खच, अस्वच्छता याबाबत तंटामुक्त अध्यक्ष पवार यांनी उपयुक्त सूचना केल्या. डॉ. आघाव यांनी बारागाव नांदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न मांडला. नविन झालेले बांधकाम पडत असल्याने ठेकेदारावर कारवाईचा प्रस्ताव मांडण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांसह महिला व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय प्रशासनाकडून सहाय्यक गटविकास अधिकारी तारडे, कनिष्ठ अभियंता मानकर, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते. याप्रसंगी बाबाभाई इनामदार, रफिक इनामदार, श्रीराम गाडे, यमनाजी आघाव, रफिक शेख, कैलास पवार, सेनेचे बाळासाहेब गाडे, विनोद पवार, कैलास पवार, चंद्रकांत जाधव, ग्रामसेक सदस्य हबीबभाई देशमुख, विठ्ठल पारधे, सचिन कोहकडे, अशोक धनवडे, नदीम देशमुख, अशोक आंधळे, सलिम काकर, अनुराधाताई मंडलिक, सोनलताई गाडे, संजय बर्डे, दीपक पवार, योगेश साळवे, राम शिंदे, सागर गाडे, शरद पवार, नितीन गाडे, केशव तिकोणे, राजेंद्र गाडे, कुलदिप पवार, नवाज देशमुख, नवाज इनामदार, अनिस सय्यद, ताजू सय्यद, अर्शद पिरजादे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बारागाव नांदूर गावात जलजीवन मिशन योजनेबाबत अत्यंत नित्कृष्ट व संथ गतीने कामकाज सुरू आहे. गावात जलजीवन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च होऊनही ग्रामस्थांना नविन पाईपलाईनद्वारे थेंबभर पाणी मिळालेले नाही. बारागाव नांदूर परिसरात कामकाज जलजीवन मिशन अंतर्गत काम करणार्या ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली.
सभास्थळी एका गटाची प्रचारसभा झाली. त्या सभेसाठी खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. प्रचारसभा आटोपताच ग्रामसभा सुरू झाली. उपलब्ध खुर्च्यावर ग्रामस्थांनी बसत गावातील विषयांवर चर्चा सुरू झाली. तनपुरे कारखान्याच्या त्या प्रचारसभेमुळे गावात पहिल्यांदाच ग्रामस्थांना ग्रामसभेत बसण्यास खुर्च्या मिळाल्याची चर्चा होत होती.
बारागाव नांदूर ग्रामसभेला नेहमीप्रमाणे यंदाही अनेक शासकीय प्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवली. गावाच्या विकासाबाबत संबंधित शासकीय प्रतिनिधींना घेणे देणे नाही. अनुपस्थित शासकीय प्रतिनिधींवर कारवाईचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.