स्वबळावरच लढू! काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा संगमनेरातून निर्धार Pudhari
अहिल्यानगर

Congress Meeting: स्वबळावरच लढू! काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा संगमनेरातून निर्धार

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक; आगामी निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची एकमुखी मागणी

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: भूलथापा व जातीयवादामुळे महायुतीचे खरे रूप जनतेला कळाल्याने युवक व महिलांमध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध मोठा असंतोष निर्माण झाला आहे. काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्ह्यात स्वबळावर लढवाव्यात, अशी एकमुखी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कालच्या बैठकीत करण्यात आली. (Latest Ahilyanagar News)

संगमनेर येथे अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक रविवारी दुपारी संपन्न झाली. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत ओगले, कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, प्रतापराव शेळके, मधुकरराव नवले, राहुरी तालुका अध्यक्ष बाळासाहेब आढाव, अकोले तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे, संभाजी रोहोकले, ॲड.पंकज लोंढे, बाबासाहेब दिघे, किरण पाटील, शब्बीर शेख, शहाजी भोसले, संभाजी माळवदे, तुषार पोटे, सचिन चौगुले, समीर काझी, राहुल उगले, नसीर शेख, दादा पाटील वाकचौरे, अरुण म्हस्के, नितीन शिंदे, साहेबराव बागुल, अजय फटांगरे, रिजवान शेख, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सर्व जिल्हा कमिटी सदस्य सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था या स्वबळावर लढवण्याची एकमुखी मागणी केली.

कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, महायुतीच्या भूलथापांना लोक कंटाळले आहे. खरे तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव निश्चित होता. परंतु महायुती का जिंकली, हे सर्वश्रुत आहे. यामुळे जनतेच्या मनामध्ये मोठी चीड आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी असून काँग्रेस पक्ष ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत मोठे यश मिळेल.

करण ससाणे म्हणाले की, देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आता संपूर्ण देशातील वातावरण बदलले आहे. बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचे सरकार येणार असून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरचा ठरेल.

मधुकरराव नवले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज,फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा काँग्रेसचा विचार आहे.

शहाजी भोसले म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून बनवाबनवी करणाऱ्या या पक्षाची काळी जादू ओसरली असून यापुढील काळात तरुण जाती धर्माच्या नावावर नव्हे तर विकासाच्या नावावर निवडणुकांमध्ये साथ देतील.

अरुण म्हस्के म्हणाले की, लाडक्या बहिणीच्या नावाखाली महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान करणारे हे सरकार असून महाराष्ट्रात स्त्रिया सुरक्षित नाहीत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढवून नंबर एकचा पक्ष ठरेल.

सचिन चौगुले म्हणाले की, महायुतीमध्ये चलबिचल आहे. ज्यांनी आयुष्यभर भाजपाचे काम केले, त्या खऱ्या कार्यकर्त्यांना दुर्लक्षित करण्यात आले आहे.

यावेळी सर्व तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांनी आपली मनोगते व्यक्त केली. व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदा या स्वबळावर लढवण्याची मागणी केली.

काँग्रेसला मोठी संधी: आ. ओगले

आमदार हेमंत ओगले म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी विचारधारा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा हा पक्ष आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. त्यामुळे या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी जिल्ह्यातील काँग्रेसची आहे. मात्र आमचे नेते बाळासाहेब थोरातांकडे कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मांडल्या असून त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT