ड्रेनेज लाईनचे काम 15 दिवसांत पूर्ण करा; आयुक्तांचे ठेकेदाराला आदेश Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar News: ड्रेनेज लाईनचे काम 15 दिवसांत पूर्ण करा; आयुक्तांचे ठेकेदाराला आदेश

आशा टॉकीज, आनंदी बाजार परिसरातील कामांची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरात माळीवाडा ते माणिक चौक ते भिंगारवाला चौक, तसेच अमरधाम ते आनंदी बाजार ते जिल्हा वाचनालय या रस्त्यांची काँक्रिटीकरणाची कामे सुरू करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी ड्रेनेज लाईन व पावसाळी गटारांची कामे सध्या सुरू आहेत. पावसाळा तोंडावर असल्याने येत्या 15 दिवसात ही कामे पूर्ण करावी, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत.

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सोमवारी (दि. 19) शहरातील रस्ते व पावसाळी गटारीच्या कामांचा आढावा घेतला. विशेषतः जिल्हा वाचनालय ते आनंदी बाजार ते नालेगाव अमरधामपर्यंत सुरू असलेली पावसाळी गटार व माणिक चौक परिसरातील गटारीच्या कामाची त्यांनी समक्ष पाहणी केली. (Ahilyanagar News update)

रस्त्यावर खोदाई करून चेंबर बांधले जात आहेत. त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. या पावसाळी गटारीमुळे शहरातील रस्त्यांवरून वाहणारे पाणी व रस्त्यावर चौकात असणार्‍या पाण्याचा तत्काळ निचरा होण्यास मदत होणार आहे. मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामध्ये काही ठिकाणी पूर्ण झालेल्या गटारीमुळे दहा ते पंधरा मिनिटांत तेथे साचलेल्या पाण्याचा निचरा झाला आहे. या कामानंतर या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

सध्या मान्सूनपूर्व पाऊस सुरू असून येत्या पंधरा दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. पावसाळ्यात नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सुरू असलेल्या कामांना गती द्यावी. 15 दिवसांत म्हणजे 31 मे पूर्वी पावसाळी गटारीची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिले आहेत.

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला, तसेच या कामावर नियुक्त असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार कंपनीलाही कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले. या कामांमुळे मध्य शहरातील नागरिकांना, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र लवकरच हे काम पूर्ण होईल. शहरातील रस्ते व पावसाळी गटारी याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी ही कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT