नगर : महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या चौकशीचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. नियमानुसार चौकशी करत तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी सोमवारी (दि.27) दिले आहेत. (Latest Ahilyanagar News)
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने 4 जून 2025 आणि 10 ऑक्टोबर 2025 रोजी नगरविकास विभागाला आदेश दिला. चौकशी करून अहवाल देण्याचे आदेशात म्हटले होते. मात्र नगरविकास विभागाने कोणतीही चौकशी न करता आयोगाला कोणताच अहवालही दिला नाही. निवडणूक आयोगाच्या आदेशाला नगरविकास विभागाने केराची टोपली दाखविल्याचा आरोप शाकीर शेख यांनी केला आहे.
शेख यांनी डांगे यांच्या आयुक्तपदावरील नियुक्तीबाबत आक्षेप घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळे डांगे यांची नगर महापालिकेत नियुक्ती झाली असून, ते पक्षपातीपणा करतात, असा दावा आक्षेपात शेख यांनी केला आहे. आता नगरविकास विभाग चौकशी करून काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीला शेख यांनी 24 मे 2025 रोजी आक्षेप घेतला होता. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने 4 जून 2025 रोजी नगरविकास विभागाला पत्र पाठवून आक्षेपांची चौकशी करून व नियमानुसार कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. पण नगरविकास विभागाने काहीच कार्यवाही केली नाही. निवडणूक आयोगाने पुन्हा 10 ऑक्टोबरला नगरविकास विभागाला दुसरे पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. शेख यांनी निवडणूक आयोगाकडे 16 ऑक्टोबरला पुन्हा तक्रार करून आयुक्त डांगे यांच्यावर नगरविकास विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत आयोगाने नगरविकास विभागाला तिसरे पत्र पाठवून तातडीने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून नियमानुसार आवश्यक पुढील कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेत सहायक आयुक्तपदी कार्यरत असताना यशवंत डांगे यांची कौटुंबिक कारणास्तव नगर महापालिकेत आयुक्त-प्रशासकपदी नियुक्ती करण्याची शिफारस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 3 जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी 30 जून 2024 रोजीच आमदार संग्राम जगताप यांनी शिंदे यांना पत्र पाठवून नगर महापालिकेच्या रिक्त आयुक्तपदी डांगे यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. या दोन्ही शिफारशींना सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आक्षेप घेणारे पत्र निवडणूक आयोगाला पाठविले होती. मात्र त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेनंतर शेख यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आयुक्त डांगे यांच्या बदलीची मागणी केली आहे.