मोहरीचा पूल वाहून गेला Pudhari
अहिल्यानगर

Unseasonl Rain: ढगफुटीसदृश पावसाने मोहरीचा पूल वाहून गेला!

unseasonal Rain affects: नद्या-नाले दुथडीतलाव-बंधारे भरले

पुढारी वृत्तसेवा

Unseasonal Rain In Pathardi:

पाथर्डी: तालुक्यात शनिवारी (दि. 24) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने दाणादाण उडाली. तालुक्यात प्रथमच उन्हाळ्यात दमदार पाऊस झाल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे. पावसाने नदी-नाले ओसंडून वाहू लागले असून, बंधारे तुडुंब भरले आहेत. तसेच मोहरी तलावही भरला आहे. एकूणच पावसाने शेतकर्‍याचेही मोठे नुकसान झाले आहे. (Ahilyanagar News Update)

मेमध्येच तालुक्यात पावसाला सुरुवात झाली.शनिवारी गर्भगिरी डोंगर परिसरात जोरदार पाऊस कोसळल्याने तालुक्यातील अनेक गावांतील पाझर तलाव, नालाबांध, आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहेत. या पावसाने मढी, माणिकदौंडी, मोहरी, तारकेश्वर गड, मोहटादेवी, चिंचपूर इजदे, चिंचपूर पांगूळ, जोगेवाडी, वडगाव, करोडी, टाकळीमानूर येथील नद्या, नाले, आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. या पावसाने शेतीला फायदा होण्याबरोबरच काही ठिकाणी मोठे नुकसानही झाले. विशेषत: मोहरी येथील सिमेंट-काँक्रिटचा पूल वाहून गेल्याने बन वस्तीतील दीडशे लोकांचा संपर्क तुटला.

या पावसाने विठ्ठलवाडी (कुत्तरवाडी) तलावात पाण्याची मोठी आवक वाढली आहे. हा तलाव निम्म्याहून अधिक भरला आहे. तसेच, वडगाव आणि चिंचपूर पांगुळ येथील बेलपारा प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू झाली आहे, असे वडगावचे आजीनाथ बडे यांनी सांगितले.

मोहरी येथील तलाव अर्ध्याहून अधिक भरला आहे. तारकेश्वर गडाच्या पायथ्याशी असलेला पाझर तलावही पूर्णपणे भरला असून, येथून मोहटादेवी देवस्थानला पाणीपुरवठा होतो. माणिकदौंडीच्या पटेलवाडा तलावात पाण्याची मोठी आवक होत आहे. शनिवार आणि रविवारपासून पाऊस सुरू आहे. भिलवडे येथील बंधारे भरायला सुरुवात झाली असून, गावाचा पाण्याचा टँकर बंद झाल्याचे सरपंच सुरेश बडे म्हणाले.

चिंचपूर इजदे येथील किन्ही नदी वाहती असून, स्थानिक नागरिकांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत मे महिन्यात ही नदी कधीच वाहिली नव्हती. याशिवाय, मोहरी येथील बन वस्तीकडे जाणारा सिमेंट-काँक्रिटचा पूल पावसाने वाहून गेला. त्यामुळे बन वस्तीतील सुमारे दीडशे लोकांचा संपर्क तुटला असून, जनावरांचा चारा आणि दैनंदिन कामांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पावसामुळे शेतकर्‍यांच्या शेतीची मशागत पूर्ण झाली नाही. मोहरी येथील डोईफोडे वस्तीवरील पाझर तलाव अवघ्या अर्ध्या तासात भरला, असे ग्रामपंचायत सदस्य भीमराव सुसलादे आणि शेतकरी संजय बन यांनी सांगितले. ते म्हणाले की, साठ टक्क्यांहून अधिक शेतकर्‍यांच्या जमिनीची नांगरट अद्याप झाली नाही. यावर्षी जूनपूर्वीच पाऊस आल्याने शेतीची मशागत पूर्ण होऊ शकली नाही. तणनाशकांचा वापर वाढल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती गोरक्ष सुसलादे यांनी व्यक्त केली.

चिंचपूर इजदे परिसरात बागायती क्षेत्र असून फळबागांचे नुकसान झाले आहेत. विशेषता आंब्याच्या फळांचे नुकसान झाल्याचे अरुण मिसाळ, अ‍ॅड उद्धव खेडकर यांनी दिली. करंजी घाटातही शनिवारी रात्री सर्वत्र धुके दाटल्याने वाहनचालकांची अडचण निर्माण झाली.तालुक्यात दोन-तीन ठिकाणी घरांचे नुकसान झाले. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे तहसीलदार उद्धव नाईक यांनी सांगितले.

तालुक्यात झालेल्या पावसाची नोंद अशी

पाथर्डी 34.3 मिमी, माणिकदौंडी 34.3 मिमी, टाकळी मानूर 49.5 मिमी, कोरडगाव 29 मिमी, करंजी 40.8 मिमी, मिरी 23.5 मिमी, तिसगाव 23 मिमी, खरवंडी 49.5 मिमी, आणि अकोला 29 मिमी पावसाची नोंद झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT