सोमनाथ मैड
सावेडी: शहरासह सावेडी उपनगरात मोकाट कुत्र्यांच्या झुंडी रस्त्यांवर फिरताना दिसतात. त्यांच्या हल्ल्यातून अनेक जण वाचल्याची उदाहरणे आहेत. शहरात एका बालकावरही मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती.
मात्र तरीही या मोकाट कुत्र्यांना मटन शॉपमधील टाकाऊ भाग (अॅनिमल वेस्ट) खाण्यास दिला जात असल्याचे समोर आले आहे. त्याची मांसाची चटक लागलेल्या या कुत्र्यांकडून माणसांवर हल्ल्याची भीती व्यक्त होत असून, त्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Latest Ahilyanagar News)
सावेडी उपनगरातून शहरात येण्यासाठी अप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा हा रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर नेहमी वाहनचालकांसह पायी चालणार्याची वर्दळ असते. मात्र याच रस्त्यादरम्यान एक हातगाडी चालक सकाळी नित्यनियमाने परिसरातील मटन शॉपने रात्री फेकून दिलेले अॅनिमल वेस्टेज रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांना खाण्यास देत आहे.
त्यामुळे या परिसरात नेहमी मोकाट कुत्र्यांच्या झुंडी उभ्या असतात. परिणामी रस्त्यावरून मार्ग काढताना दुचाकीचालकांसह नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते. या प्रकारातून सर्वसामान्य नागरिकांवर हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे. मनालेगावात पाच वर्षांच्या मुलावर हल्लाशहरात मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ला झाल्याच्या अनेक घटना ऐकायला येतात.
नालेगावात काही दिवसांपूर्वी विकी वाघ या सामाजिक कार्यकर्त्याच्या पाच वर्षांच्या मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. तेथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाला निवेदनही दिले होते. त्यावरही अद्याप महापालिकेकडून दखल घेतली गेली नसल्याचा आरोप होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना!
मोकाट कुत्र्यांकडून लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर होणार्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना खाऊ घालणार्या व्यक्तींनी कुत्र्यांना आपल्या घरी नेऊन खाऊ घालावे, अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच एका खटल्याच्या निकालात दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगरमधील या व्यक्तीवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहरातील नालेगाव, गाडगीळ पटांगण, चितळे रोड, दिल्ली गेट, गांधी मैदान, सावेडी भागात गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड व तपोवन रोड भागात या परिसरामध्ये मोकाट कुत्री टोळक्याने फिरत असतात. नागरिकांमध्ये त्यांची दहशत आहे. मात्र महापालिकेकडे मोकाट कुत्री पकडण्याची यंत्रणाच नाही. एकटादुकटा माणूस किंवा मुलांवर ही कुत्री झुंडीने धावून जातात. पहाटे फिरायला जाणार्यांच्या जीवितासही त्यांचा धोका आहे. या कुत्र्यांचा महापालिकेने त्वरित बंदोबस्त करावा.-श्रीनिवास बोज्जा, सामाजिक कार्यकर्ते
शहरासह उपनगरातील मटनविक्रेते अॅनिमल वेस्टेज कोठला, पत्रकार चौक, सिव्हिल बसस्टॉपसमोर, संभाजीनगर रस्त्यांच्या कडेला गोण्यांमध्ये भरून टाकले जाते. तेथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वावरत असतात. ही कुत्री जाणार्या-येणार्यांवर हल्ला करण्याची भीती असते. मटनशॉप चालकांनी अॅनिमल वेस्टेज स्वतः नष्ट करावे.- युवराज महाले
मोकाट कुत्र्यांना अॅनिमल वेस्टेज देत असल्याच्या कारणाने या हातगाडी चालकास अनेकदा समज दिली. मात्र तो शिवीगाळ करतो. रोज सकाळी भटक्या कुत्र्यांना मांसाचे तुकडे देतो. यातून मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे.- आशिष जग्गी