टाकळी ढोकेश्वर: धान्यात टाकलेल्या किडनाशक पावडरच्या गॅसमुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर आई व बहिण अत्यवस्थ असून त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारनेर तालुक्यातील ढोकी येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली.
हर्षद विठ्ठल धरम ( वय पाच महिने) आणि नैतीक विठ्ठल धरम (वय 5 वर्षे) अशी मृत दोघांची नावे आहेत. सोनाली विठ्ठल धरम व संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Latest Ahilyanagar News)
ढोकी येथील विठ्ठल लक्ष्मण धरम यांनी कीडनाशकाच्या पुड्या टाकळी ढोकेश्वर येथील कृषी सेवा केंद्रातून घेतल्या. शुक्रवारी घरी आणलेल्या पुड्या शनिवारी (दि.27) बाजरीच्या पोत्यांमध्ये फोडून टाकल्या. रात्रभर त्या पुड्यांचा गॅस तयार झाला अन् रविवारी पहाटे कुटुंबाला त्याचा त्रास सुरू झाला.
हर्षद आणि नैतीक या चिमुकल्यांना उलट्या पोट दुःखीचा त्रास सुरु झाल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही घरी आणले. काही वेळाने पुन्हा तसाच त्रास सुरू झाला. त्यानंतर आई, तीन मुलांना टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात आणण्यात आले.
उपचारापूर्वी केलेल्या तपासणीत नैतिक व हर्षद यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर अत्यवस्थ आई सोनाली विठ्ठल धरम व चुलत बहिण संस्कृती एकनाथ धरम यांच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन चिमुरड्यांवर शोकाकुल वातावरणात ढोकी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले