जामखेड: नागोबाचीवाडी येथे नियोजित असलेला एक बालविवाह 'उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पा'च्या वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे यशस्वीरित्या थांबवण्यात आला. यामुळे एका अल्पवयीन मुलीचे आयुष्य बालविवाहाच्या दुष्परिणामांपासून वाचले असून,तिला शिक्षणाचे आणि उज्ज्वल भविष्याचे दार खुले झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाटोदा जिल्हा बीड येथील अल्पवयीन मुलीचा नागोबाचीवाडी ता.जामखेड येथील एका कुटुंबात विवाह निश्चित करण्यात आला होता. गोपनीय सूत्रांकडून 'उडान' प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण कदम,योगेश अब्दुले यांना या संभाव्य बालविवाहाची माहिती मिळाली. माहिती मिळताच 'उडान' प्रकल्पाचे महिला व बाल हक्क कार्यकर्ते योगेश अब्दुले यांनी तातडीने सूत्रे हलवली. (Latest Ahilyanagar News)
'उडान' प्रकल्पाच्या टीमने आणि स्थानिक प्रशासनाने सर्वप्रथम मुलीच्या पालकांशी संपर्क साधला.'उडान' प्रकल्प जनजागृती,बालविवाह प्रतिबंध करणे,शिक्षण,पुनर्वसन,आरोग्य आणि स्वावलंबन यांवर काम केले जाते.पालकांना बालविवाहामुळे मुलीच्या आरोग्यावर,शिक्षणावर आणि मानसिक स्थितीवर होणारे गंभीर दुष्परिणाम समजावून सांगितले.
तसेच बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून त्यासाठी असलेल्या शिक्षेबद्दलही पालकांना माहिती देण्यात आली.सुरुवातीला काही प्रमाणात विरोध झाला असला तरी 'उडान'च्या कार्यकर्त्यांनी संयमाने आणि सहानुभूतीने पालकांचे समुपदेशन केले.त्यांना मुलीच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देण्यात आले.
स्थानिक प्रशासनाचे सहकार्य या प्रयत्नांमध्ये स्थानिक पोलीस आणि ग्रामसेवक बबन बहिर यांनी 'उडान' प्रकल्पाला मोलाची मदत केली.पोलीस आणि ग्रामसेवकांनीही पालकांशी संवाद साधत बालविवाह न करण्याबद्दल आवाहन केले.प्रशासनाच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे पालकांनी अखेर आपल्या मुलीचा विवाह रद्द करण्याचा निर्णय घेतला.हा प्रसंग स्थानिक प्रशासनाच्या आणि सामाजिक संस्थांच्या प्रभावी समन्वयाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध जागरूकता हवी
यशस्वी हस्तक्षेप 'उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पा'च्या ग्रामीण भागातील प्रभावी कार्याचे द्योतक आहे.अशा घटनांमुळे समाजातील प्रत्येक घटकाने बालविवाहासारख्या कुप्रथेविरुद्ध जागरूक राहणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते.'उडान' प्रकल्पाचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून, यामुळे अनेक मुलींचे आयुष्य सुरक्षित होण्यास मदत होत आहे.