

पाथर्डी तालुका: भारजवाडी (ता. पाथर्डी) येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एका मुलाने रागात आईच्या पोटात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणात आरोपी मुलगा अजिनाथ ढाकणे (वय 35) यास अटक करण्यात आली आहे.
या घटनेत रंभाबाई ढाकणे (वय 60, रा. भारजवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेच्या दिवशी रंभाबाई ढाकणे या घरात एकट्याच असताना मुलाने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. (Latest Ahilyanagar News)
पैसे न मिळाल्याने संतापलेल्या अजिनाथने आपल्या पँटच्या खिशातून चाकू काढून थेट आईच्या पोटात वार केला. जोरात ओरडल्याने घराजवळच असलेले नातेवाईक पप्पू बटुळे यांनी धावत येत जखमी महिलेला वाचवले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
फिर्यादी म्हणून रंभाबाई यांची मुलगी मनीषा ज्ञानदेव बटुळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून आरोपीस अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव करीत असून, पोलिस शिपाई नीलेश गुंड मदत करत आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे.