नगर तालुका: छत्रपती संभाजीनगर महामार्गाची खूपच दुरवस्था झाली असून, महामार्गावर विविध ठिकाणी अनेक लहान-मोठे खड्डे पडले आहेत. वारंवार मागणी करून देखील महामार्ग दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. जेऊर परिसरात महावितरण कंपनी परिसरात भारत पेट्रोल पंपाशेजारी खूपच मोठा खड्डा पडला आहे. येथे दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. सदर खड्डा हा मृत्यूला निमंत्रण देत असून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची गेल्या आठ महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. काही भागातील खड्डे बुजविण्यात आले परंतु महामार्ग दुरुस्तीचे काम अचानक थांबविण्यात आल्याने नागरिकांमध्ये देखील रोष निर्माण झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण न करताच का थांबविण्यात आले असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
धनगरवाडी, जेऊर परिसरात महामार्गाची अक्षरक्षा चाळण झाली आहे. महामार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे, तर नागरिकांनाही हाडांच्या विविध समस्या उद्भवत आहेत. महामार्ग दुरुस्तीसाठी अनेक वेळा आंदोलन, गांधीगिरी, निवेदने देण्यात आली होती परंतु त्याकडे पूर्णता प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप विविध गावच्या ग्रामस्थांमधून केला जात आहे.
जेऊर येथील भारत पेट्रोल पंपाशेजारी महामार्गावरच मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने दररोज अनेक दुचाकीचालक पडून जखमी होत आहेत. तसेच अनेक चारचाकी गाड्या देखील पलटी झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. तरी छत्रपती संभाजीनगर महामार्गाची दुरुस्ती करावी, तसेच जेऊर येथील ’तो’ खड्डा तात्काळ बुजविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
महामार्गावरून अनेक शालेय विद्यार्थी सायकलवरून प्रवास करत असतात. इमामपूर येथून जेऊर येथे शिक्षणासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी सायकलवर ये-जा करतात. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. अपघातात अनेक निष्पापांचे बळी जातात. अनेकांचे संसार उघड्यावर येतात. त्यामुळे सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.उद्धव मोकाटे, सामाजिक कार्यकर्ते, इमामपूर
छत्रपती संभाजीनगर महामार्गाची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. वाहन चालवणे देखील अवघड झाले आहे. शालेय विद्यार्थी तसेच नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अपघातांची मालिका सुरूच आहे. तात्काळ महामार्ग दुरुस्तीची गरज आहे.मनोज कोथिंबिरे, युवा नेते