टाकळीभानच्या ग्रामसभेत राडा, गदारोळ! सदस्यांनी फिरविली पाठ Pudhari
अहिल्यानगर

Taklibhan Gramasabha Rada: टाकळीभानच्या ग्रामसभेत राडा, गदारोळ! सदस्यांनी फिरविली पाठ

बहुतांश विद्यमान सदस्यांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरविल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.

पुढारी वृत्तसेवा

टाकळीभानः सत्ताधारी सदस्यांच्या गेल्या साडेचार वर्षातील कामकाजावर प्रश्न उपस्थित करीत, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीची ग्रामसभा तब्बल तीन तास राडा अन् गदारोळातचं उरकण्यात आली.

सरत्या पंचवार्षिक सत्तेतील ही शेवटची ग्रामसभा असल्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांना टार्गेट करीत, परत गेलेल्या निधीसंदर्भात जाब विचारला. यामुळे सभेत वेळोवेळी खटके उडाले. बहुतांश विद्यमान सदस्यांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरविल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. (Latest Ahilyanagar News)

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना रणनवरे होत्या. स्वातंत्र्य दिनी होणारी ग्रामसभा गुरुवारी 28 रोजी ग्रामसचिवालय प्रांगणात गदारोळात पार पडली. तब्बल तीन तास ग्रामसभा सुरुच होती. गेल्या साडेचार वर्षातील सत्ताधार्‍यांच्या कामकाजावर सर्व वक्त्यांनी टीकास्त्र सोडत केलेल्या विकास कामांची यादी मागितली. याबाबत संपूर्ण माहिती सत्ताधार्‍यांकडे उपलब्ध नसल्यामुळे चांगलाच गदारोळ झाला.

बापूसाहेब नवले यांनी, गेल्या साडेचार वर्षात ग्रामसभेत उपस्थित केलेल्या किती तक्रारींची दखल घेतली, याचा लेखाजोखा मागितला. संपूर्ण कार्यकाळात सत्ताधार्‍यांनी ग्रामसभेची खिल्ली उडविल्याचा आरोप त्यांनी केला. ‘महावितरण’ने स्मार्ट मिटरची सक्ती करु नये, असा ठराव त्यांनी मांडला.

अनिल बोडखे यांनी, सत्ताधार्‍यांच्या कामांचा लेखाजोखा मागितला, तर संजय रणनवरे यांनी, कामगारांचे पगार वाढवावेत, आठवडे बाजारच्या कर वसुलीचा ठेका ग्रामस्थांना माहिती न देताच दिल्यामुळे फेर लिलाव करावा, अशी मागणी केली. रामेश्वर आरगडे यांनी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदली कराव्यात, असा ठराव मांडला.

साडेचार वर्षात सदस्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे 45 लाख रुपयांचे अद्ययावत वाचनालय, 10 लाख खर्चाचे एसटी बस स्टँड, 60 लाखाचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, 2 कोटीची जल जीवन योजना, 10 लाखाचे आमदार लहू कानडे यांच्या निधितील पथदिवे आदी कामे सुरुच न केल्यामुळे काही निधी परत गेला, तर काही परत जाणार असल्याचे सांगत, गावच्या विकासाला सत्ताधार्‍यांनी खोडा घातला, असा थेट आरोप त्यांनी केला. सत्ताधार्‍यांनी निवडणुकीत खोटी आश्वासने देवून, मते मिळवून सत्तेत आले.

तरुणांना व्यापारी गाळे दिले नाही, रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले नाही. कोणतेही भरीव काम न करता, आलेला निधी परत पाठविणारे हे सदस्य मंडळ ठरले आहे, असा थेट आरोप भाजपाचे नारायण काळे यांनी सत्ताधार्‍यांविरुद्ध केला. माजी उप सरपंच भारत भवार यांनी, पात्र घरकुल लाभार्थिंची ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे, असा आरोप करताच, मोठा गदारोळ झाला. बापूसाहेब शिंदे यांनी, घरकुल अतिक्रमण शासनाच्या आदेशानुसार नियमानुकूल करण्यात येणार असल्याने पात्र लाभार्थिंना लवकरचं घरकुल देण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर यांनी, राजिनामा दिल्यामुळे तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे यांची निवड करावी, अशी सूचना माजी उप सरपंच राजेंद्र कोकणे यांनी मांडली असता, ग्रामसभेने टाळ्याच्या गजरात अनुमोदन दिले. रणनवरे यांच्या रिक्त जागी अनिल दाभाडे यांच्या नावाची सूचना अप्पासाहेब रणनवरे यांनी मांडली. ग्रामसभेने तिला मान्यता दिली.

यावेळी सोसायटीचे चेअरमन मंजाबापू थोरात, माजी चेअरमन राहुल पटारे, ‘अशोक’चे संचालक यशवंत रणनवरे, बाबासाहेब बनकर, भाऊसाहेब पवार, जालिंदर बोडखे, आबासाहेब रणनवरे, आविनाश लोखंडे, एकनाथ पटारे, भाऊसाहेब मगर, दिलीप पवार, सुधिर मगर, शिवा साठे, ग्रामपंचायत सदस्य सुनिल बोडखे, दत्तात्रय नाईक, जयकर मगर, भाऊसाहेब पटारे, संतोष पटारे, विलास दाभाडे, मेजर विनोद रणनवरे, मोहन रणनवरे, शिवाजी पवार, बबलू वाघुले, तलाठी रूपाली रामटेके व ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक मुद्यांवर तीन तास गदारोळ!

उप सरपंच कान्हा खंडागळे यांनी, काही तक्रारींवर उत्तरे दिली, तर सरपंच अर्चना रणनवरे यांनी, एका ओळीत ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडवू, असे सांगत ग्रामसभा संपली, अशी घोषणा केली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या ग्रामसभेत अनेक मुद्यांवर वेळोवेळी गदारोळ झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT