संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील चंदनापुरी घाटात काल शनिवारी (दि.१४) सायंकाळी सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. याबाबत डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जात होता.
दरम्यान, चंदनापुरी घाटात आल्यानंतर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रकची पुढील वाहनांना जोरदार धडक बसली. या धडकेमुळे पुढील वाहने एकमेकांवर आदळली. अशा प्रकारे जवळपास सात ते आठ लहान-मोठ्या वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये सहा ते सातजण किरकोळ जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक राजू खेडकर, विठ्ठल शरमाळे, खंडेराव रहाणे, विकास काकड आणि गणेश सदगीर तसेच टोलनाक्याची पेट्रोलिंग गाडी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघातामुळे पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांसह प्रवाशांचे मोठे हाल झाले.
दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणारी वाहने जुन्या चंदनापुरी घाटातून वळविण्यात आली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यासाठी हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील क्रेनला पाचारण करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने काही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनीही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.