Central approval for 4 hectares of forest land to Bhagwangarh Trust
पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा
श्रीक्षेत्र भगवानगड (ता. पाथर्डी) येथे भक्तसेवा व सामाजिक विकासकामांसाठी ४ हेक्टर वनभूमी वापरण्याला केंद्र सरकारने अखेर अंतिम मंजुरी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याची माहिती दिली.
फडणवीस यांनी म्हटले की, श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनभूमीचा वापर भक्तगणांच्या सुविधांसाठी, रुग्णालय, सामाजिक प्रशिक्षण केंद्र, वाहन पार्किंग आणि यात्री निवासासाठी करण्याची मागणी नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीस सातत्याने पाठपुरावा केल्यावर अखेर आज केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचना प्रसिद्ध करून मंजुरी दिली आहे.
त्यांनी म्हटले की, श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना त्यांना अत्यंत आनंद होत आहे. श्रीक्षेत्र भगवानगड ट्रस्टकडून या मंजुरीचा उपयोग सामाजिक विकास, भक्तगणांच्या सुविधा आणि धर्मपरायण उपक्रमांसाठी केला जाणार आहे.
भगवानगडाचा सर्वांगीण विकास होऊन मंदिराचा विस्तार होत असून, भव्य दिव्य असं संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर गडावर साकारत आहे.