अकोले : सायबर पोलिसांनी गहाळ झालेले व चोरीस गेलेले मोबाइल्स हँडसेटस् शोध मोहीमेत मोठे यश मिळविले आहे. राजुर परिसरात अनेक कंपन्यांचे विविध भागातील तब्बल 56 मोबाइल्स हँडसेटस् हस्तगत केले आहेत. त्यांची एकूण किंमत 13 लाख 17 हजार रुपये आहे.
मोबाइल्स इतर राज्यांसह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, येवला, घोटी आदी ठिकाणांहून शोधण्यात यश आले आहे. ‘सीईआयआर’च्या माध्यमातून पोलिस काँस्टेबल उषा मुठे यांनी केलेली ही यशस्वी कामगिरी मोबाईल मालकांसाठी समाधानाची बाब ठरली आहे.
मोबाइलमधील स्वतःची वैयक्तिक माहिती, फोटो व बँक अँप्स सुरक्षित ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे, असे राजूर पोलिसांकडून सांगण्यात आले. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर पोलिस स्टेशनच्या संयुक्त प्रयत्नांतून तब्बल 56 हरवलेले मोबाइल्स हँडसेटस् शोधून, पोलिसांनी ते मुळ मालकांना सुपूर्द केले आहेत. सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाइल हस्तगत करण्याच्या कामगिरीत राजूर पोलिस स्टेशन अव्वलस्थानी ठरु पाहत आहे.
ही कामगिरी राजूर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून गहाळ व चोरी झालेल्या मोबाइल्स्चा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पोलिस उप अधिक्षक सोमनाथ वाक्चौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलिस ठाण्याच्या पोलिस काँस्टेबल उषा मुठे यांनी विशेष परिश्रम घेतले.
पहिला टप्पा : सर्वप्रथम जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी.
दुसरा टप्पा : हरवलेल्या मोबाइलमधील सीमकार्ड ब्लॉक करावे. त्वरीत त्याच नंबरचे नवे सीमकार्ड खरेदी करावे.
तिसरा टप्पा : सीईआयआर पोर्टलवर तक्रारीची प्रत, मोबाइल खरेदीचे बिल व कोणतेही शासकीय ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड) अपलोड करा.
चौथा टप्पा : https://www.ceir.gov.in या वेबसाइटवर जाऊन 'Block Stolen/Lost Mobile' पर्याय निवडून सर्व आवश्यक माहिती भरावी.
हरवलेल्या मोबाइलचा गैरवापर टाळणे व तो परत मिळवून देणे, हे ‘सीईआयआर’चे मुख्य उद्दिष्ट आहे. या प्रणालीमुळे मोबाइल चोरीस गेल्यानंतर तो ब्लॉक करता येतो. यामुळे त्याचा दुरुपयोग थांबतो. मोबाइल हरवल्यास कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. तक्रार ‘सीईआयआर’ पोर्टलवर अपलोड केल्यास मोबाइल शोधण्यास मोठी मदत होते.
‘मोबाइल हरवला किंवा चोरीस गेल्यास त्वरित जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. महाराष्ट्र शासनाच्या सीईआयआर पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविल्यास मोबाइल शोधण्यास मोठी मदत होते. तक्रार वेळेवर नोंदवल्यास मोबाइल लवकर शोधून, तो मुळ मालकांना परत करण्यास पोलिसांना सोयीस्कर होते.उषा मुठे, पोलिस काँस्टेबल, राजुर पोलिस स्टेशन