पाथर्डी तालुका: पाथर्डी शहरात मॉर्निंग वॉकला गेलेल्या विजयकुमार लुणावत यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणाचा छडा लावण्यात पाथर्डी पोलिसांना यश मिळाले आहे. त्यासाठी पोलिसांनी तब्बल 18 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. रविवारी पोलिसांनी मालकासह कार ताब्यात घेतली.
गोकुळ फुंदे (रा.फुंदे टाकळी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार मालकाचे नाव आहे. गत सोमवारी पहाटे मॉर्निंग वॉकदरम्यान अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत विजयकुमार लुणावत यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचा मुलगा विनीत गंभीर जखमी झाला असून खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तो उपचार घेत आहे. (Latest Ahilyanagar News)
पोलिसांनी गंभीर दखल घेत अपघातग्रस्त वाहनाचा शोध सुरू केला. तपासादरम्यान शहरातील तब्बल अठरा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले. फुटेजमध्ये विनानंबर प्लेटची काळसर-ग्रे रंगाची बलेनो कार दिसून आली. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी खबर्यांच्या मदतीने कारची माहिती काढल्यानंतर ती पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथील गोकुळ फुंदे याच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस पथकाने गोकुळ फुंदेला ताब्यात घेतले.
पोलिस निरीक्षक विलास पुजारी, उपनिरीक्षक विलास जाधव, महादेव गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक भगवान गरगडे, संजय जाधव, ज्ञानेश्वर इलग, सागर बुधवंत, निलेश गुंड, इजाज सय्यद, सायबर सेलचे राहुल गुंडडू यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
शेवगावगच्या गॅरेजमधून कार ताब्यात
अपघातग्रस्त कार शेवगावमधील एका खाजगी गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी लावली असल्याचे गोकुळ फुंदे याने पोलिसांना सांगितले. रविवारी त्यास ताब्यात घेतल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार त्याने स्पष्ट केला.पोलिसांनी शेवगावच्या गॅरेजमधून ती कार ताब्यात घेतली.