जामखेड: दुकानामध्ये सामान घेण्यासाठी गेलेल्या दोन जणांनी दुकानातील अल्पवयीन मुलीला गोडाऊनमध्ये नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन जणांविरोधात जामखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तालुक्यातील एका मोठ्या गावात रविवारी (दि 29 जून) दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. अल्पवयीन मुलगी व तिची आई दुकानात असताना मनोज महादेव हुंबे (वय 25, रा बोर्ले, ता. जामखेड) व त्याच्यासोबत त्याचा अल्पवयीन मित्र दुकानात आले. (Latest Ahilyanagar News)
त्यांना हवे असलेले सामान देण्यासाठी दुकानातील अल्पवयीन मुलगी व आरोपी हे त्यांच्या घराजवळील गोडाऊनमध्ये गेले. या वेळी अल्पवयीन मुलाने मुलीचे तोंड दाबले व दोन्ही हात पकडले आणि आरोपी मनोज हुंबे याने अत्याचार केला. नंतर दोघेही आरोपी पळून गेले. यानंतर घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी जामखेड पोलिस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने जामखेड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मनोज महादेव हुंबे (वय 25) व त्याचा एक अल्पवयीन मित्र (दोघे रा. बोर्ले, ता. जामखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस उपविभागीय अधिकारी उगले आणि निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी केली. मनोज हुंबे हा आरोपी पसार झाला असून, सहायक पोलिस निरीक्षक वर्षा जाधव तपास करीत आहेत.
दरम्यान, याबाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले आहे, की माझ्या मतदारसंघात एका व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलीसोबत झालेला अत्याचाराचा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. यासंदर्भात मी पोलिस अधीक्षकांशी बोललो असून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दुसर्या आरोपीलाही तातडीने अटक झाली नाही तर ते प्रशासनाला परवडणार नाही.