दहिगांव: शेवगाव तालुक्यातील देवटाकळी-जोहरापूर रस्त्यावरील रेडी नदीवरील तात्पुरते बाह्यवळण भराव रस्ता नदीच्या प्रवाहात तिसर्यांदा वाहून गेला. पावसाच्या पाण्यामुळे शासनाने टाकलेला भराव रस्ता टिकत नसल्याने या कामाबाबत प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे.
जोहरापूर देवटाकळी मार्गावरील देवटाकळी येथील रेडी नदीच्या पुलाचे काम ठेकेदाराने मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सुरू केले होते. त्यावेळेस दळणवळणच्या दृष्टीने शेजारीच बाह्यवळण रस्ता तयार केला होता. (Latest Ahilyanagar News)
20 मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामध्ये प्रथम बाह्यवळण पूल वाहून गेला. त्यानंतर त्याची दुरुस्ती करून वाहतुकीसाठी पुन्हा तो सुरू केला होता. 15 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसात दुसर्यांदा तो पूल वाहून गेला. पावसाच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यावेळी वाहतूक आठवडाभर बंद होती.
देवटाकळी ग्रामस्थांनी (दि.19) जलसमाधी आंदोलन केल्यानंतर 25 ऑगस्ट रोजी पुन्हा पुल तयार करण्यात आला. मात्र 28 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसाने पुन्हा तिसर्यांदा भराव रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे देवटाकळी-जोहरापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सद्या वाहतूक भातकुडगाव फाटा मार्गे वळवली आहे. सहा किलोमीटरचा वळसा घालून वाहन चालकांना जावे लागत आहे.
जोहरापूर-देवटाकळी हा रस्ता परिसरासाठी महत्त्वाचा आहे. वर्दळीच्या रस्त्यावर नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम तोडून नवीन काम पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले. पर्यायी मार्ग म्हणून जवळून तात्पुरता रस्ता तयार केला. या रस्त्याने विद्यार्थी शेवगाव येथे शिक्षणासाठी जातात. तर वस्तीवरील मुले देवटाकळी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र,बाह्यवळण रस्ता वाहून गेल्याने त्यांचे शिक्षण पुन्हा थांबले. तसेच अनेकांची शेती नदीच्या पलीकडे असल्याने जनावरांसाठी चारा कसा आणायचा? असा प्रश्न शेतकर्यांसमोर निर्माण झाला आहे.
हिंगणगांव ते देवटाकळी रस्त्यावर पूल बांधण्यासाठी पाया खोदाईचे काम सुरू असतानाच मे महिन्यातच अवकाळी पावसामुळे नदीस पाणी आल्याने काम बंद पडले. खोदाई करण्यापुर्वी वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनविण्यात आला होता, परंतू अवकाळी पावसामुळे नदीस पुर आल्याने पर्यायी रस्ता वाहून गेला. पावसामुळे काम करण्यास अडचण येत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी पर्याय मार्ग म्हणून भातकुडगाव मार्गे प्रवास करावा.- व्ही.एम बडे, उपअभियंता
पुलाच्या बांधकामासाठी टाकलेला भराव रस्ता तिसर्यांदा वाहून गेला. लोकप्रतिनिधी याबाबत काहीच बोलत नाहीत. प्रशासनाचा कोणावरच अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे हम करे सो कायदा अशी तालुक्यात एकंदरीत परिस्थिती झालेली आहे.- संतोष आडकित्ते, शहरटाकळी