Solar Project Pudhari
अहिल्यानगर

Solar Project: वादळाने मनपाचा सौरऊर्जा प्रकल्प कोलमडला; महापालिकेला फटका

500 मेगावॉट वीज निर्मिती ठप्प, महापौर ज्योती गाडे यांच्याकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नगर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोवरील सौरऊर्जा प्रकल्पाला बसला असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे सोलर प्लांटचे मोठे नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे सुमारे 500 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौरऊर्जा प्रकल्प बंद पडला. महापौर ज्योती गाडे यांनी नुकतीच सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी करून तातडीने दुरूस्ती करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख पी. एस. बिडकर, इंजिनिअर गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने शहर पाणीपुरवठा योजनेच्या वीज बचतीत मैलाचा दगड ठरलेल्या बुरूडगाव येथील सौरऊर्जा प्रकल्पाला मोठा फटका बसला.

वादळी वाऱ्याने सौरऊर्जा प्रकल्प कोलमडून पडला. त्यामुळे दररोजच्या 500 मेगावॉट वीजप्रकल्प बंद पडला आहे. सौरऊर्जा प्रकल्प कोलमडून पडल्याची माहिती मिळताच महापौर ज्योती गाडे यांनी कचरा डेपो परिसरातील सौरऊर्जा प्रकल्पाची पाहणी केली. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महापौर ज्योती गाडे म्हणाल्या की, वाढत्या ऊर्जेच्या गरजा लक्षात घेता सौरऊर्जा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र वादळ, पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अशा प्रकल्पांचे नुकसान होत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कचरा डेपो परिसरात दोन मजबूत शेड उभारण्यात याव्यात आणि त्या शेडवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचा विचार करावा, जेणेकरून आपत्तीच्या काळात प्रकल्पांचे नुकसान कमी होईल. वीज निर्मिती अखंडित सुरू राहील. पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

दरम्यान, सौरऊर्जा प्रकल्पाच्या पाहणीनंतर महापौरांनी कचरा डेपो परिसरातील विविध प्रकल्पांचा देखील आढावा घेतला. यामध्ये खत निर्मिती प्रकल्प, बायोमेडिकल वेस्ट प्रक्रिया प्रकल्प, मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प, लिचेट प्रक्रिया प्रकल्प तसेच घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित इतर सुविधांची माहिती घेण्यात आली.

एकाच वादळात प्रकल्प कसा कोलमडला

सौरऊर्जा प्रकल्पामुळे महापालिकेच्या पाणी योजनेच्या वीजबिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प उभे केले आहेत. मात्र, एका वादळी पावसाने सौरऊर्जा प्रकल्प कोलमडून पडल्याने त्या कामाबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्याची चर्चा शहरात आहे.

सौरऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज असून अशा प्रकल्पांचे संरक्षण आणि देखभाल तितकीच महत्त्वाची आहे. नुकसानग्रस्त सोलर प्लांटची तातडीने दुरुस्ती करून वीज निर्मिती पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत.

- ज्योती गाडे, महापौर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT