अनैतिक संबंधातून महिलेचा खून; प्रियकरानेच काढला काटा  File Photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Crime: अनैतिक संबंधातून महिलेचा खून; प्रियकरानेच काढला काटा

श्रीरामपूर, राहुरीच्या चार जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

Crime News: सोनारी (ता. परंडा, जि. धाराशिव) येथे अनोळखी महिलेचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी कौशल्याने तपास करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघांना अटक केली. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी सांगितले, की अंदाजे 30 वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी येथील शिवारात दि. 17 नोव्हेंबररोजी आढळला होता. या महिलेच्या डाव्या हातावर ‘प्रकाश’ असे नाव गोंदले होते. तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. तर तिला पुलावरुन पाण्यात फेकण्यात आले होते.

या प्रकरणी रामकिसन दगडू कुंभार यांनी माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्युचा गुन्हा नोंद झाला होता. त्यातच कोणताच पुरावाही नसल्याने पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी यासाठी खास तपास पथक स्थापन केले. त्यानंतर लागलीच पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली.

यात एक कार संशयास्पद असल्याचे समोर आले. त्या कारचा माग काढत पोलीस पढेगावपर्यंत (ता. श्रीरामपूर) गेले. तेथून कारचालक संदीप तोरणे (वय 34) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली.

संबंधित मृत महिलेचे श्रीरामपूर येथील विश्वास झरे याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून ती झरे याच्याकडे सातत्याने पैसे मागायची. या त्रासाला कंटाळून झरे याने तोरणे तसेच सोमनाथ कराळे (वय 27), महेश जाधव (वय 19) यांना 92 हजार रुपयांची सुपारी दिली.

या तिघांनी या महिलेला 16 नोव्हेंबरला रात्री तुळजापूरला देवदर्शनाला जायचे आहे असे सांगून गाडीत घेतले. तिला नेवासा फाट्यावरुन घोडेगाव, नगर, कडा, आष्टी, जामखेड, खर्डा, आंबीमार्गे सोनारी गावाजवळील पुलावर आणले. तिथे तिचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला. हरण ओढा पुलावरुन खाली फेकून देण्यात आले. पोलिसांनी इतर तिघांनाही सोनई येथील (ता. नेवासा) वंजारवाडी शिवारातून अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT