संगमनेर: मतदार जनतेच्या मनात आजही ईव्हीएम मशिनबाबत शंकेचे वातावरण आहे. विधान सभेसाठी अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. इतके मतदार वाढले कसे, शेवटच्या तासामध्ये तब्बल 6 लाख मतदान कसे वाढले. अहिल्यानगर जिल्ह्यात एका होस्टेलमध्ये 7 हजार मतदार नोंदणीसह त्यांना कार्ड देण्यात आले होते. भाजप व मित्रपक्ष जिंकण्यासाठी काहीही करतात. निवडणूक आयोग स्वायत्त न राहता आता ‘बीजेपी’साठी काम करीत आहे, असे घणाघाती आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहेत.
काँग्रेस राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य, माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात, निवडणूक आयोगासह महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून केलेल्या फिक्सिंगबाबत बोलत होते. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत सरकारसह निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, मात्र अद्याप निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. मतदार जनतेचे लक्ष वळविण्यासाठी याप्रश्नांची काही मंत्रीच उत्तरे देतात, मात्र ही उत्तरे देण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.
निवडणूक निकालानंतर व्हीव्हीपॅटच्या स्लिप मिळायला पाहिजे होत्या, परंतू त्या निवडणूक आयोगाने नाकारल्या. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे 1,57 उमेदवार विजयी होतील, असा खात्रीशीर अंदाज होता, परंतू मतदारांची संख्या वाढविणे, हे त्यांचे ‘प्लॅनिंग’चे राजकारण होते, असे टीकास्त्र सोडून थोरात म्हणाले की, अनितीचे राजकारण लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे.
‘लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगले वातावरण होते. विधानसभेसाठीही चांगले होते, मात्र वाढलेले मतदार, शेवटच्या तासामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का. भाजपचा 149 जागांपैकी 232 जागांवर विजय. इतका मोठा ‘स्ट्राईक रेट’ हे सर्व संशयास्पद आहे.माजी मंत्री, बाळासाहेब थोरात
खासदार राहुल गांधी यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. निवडणूक आयोगाऐवजी दुसरेचं लोक उत्तरे देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्तेसाठी काहीही करणार्या भाजपने महाराष्ट्र विधानसभेमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ केली असे टीकास्त्र सोडत, थोरात म्हणाले की, देशाची लोकशाही राज्यघटना टिकली पाहिजे, यासाठीच आमचा लढा सुरू राहिल. काँग्रेस व महाविकास सर्वात शाश्वत व विश्वासाचा संगमनेर मतदार संघातून बाळासाहेब थोरात विजयी होणारचं, ही काळ्या दगडावरची रेघ होती, मात्र संगमनेरचा अनपेक्षित निकाल केवळ राज्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी धक्कादायक ठरला आहे. हे असे कसे होऊ शकते, हा मोठा प्रश्न राज्यामध्ये उपस्थित झाला आहे. आम्ही केलेल्या, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतच्या वक्तव्याबाबत देशामध्ये गंभीरतेने विचार होत आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.