Ram Shinde Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Legislative Council Election: अहिल्यानगर विधान परिषद जागेवर भाजपचाच दावा; राम शिंदेंचे मोठे संकेत

महायुतीतील जागावाटपावर कोअर कमिटीचा अंतिम निर्णय; सुजय विखे, सत्यजित कदमांसह अनेक इच्छुक रिंगणात

पुढारी वृत्तसेवा

नगर: राज्यात विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेवर भाजपचाच हक्क आहे. कारण सर्वाधिक मतदार भाजपकडे आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावर चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या असून, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह कोअर कमिटीची बैठक होऊन जागावाटपाचे सूत्र ठरणार आहे. अहिल्यानगरच्या जागेबाबत मात्र ऐन वेळी वेगळा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, अशोक खेडकर आदी उपस्थित होते. सभापती राम शिंदे म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे विधान परिषदेच्या निवडणुका लांबल्या. मात्र, निवडणूक आयोगाने आदेश दिल्याने 18 जुलै रोजी या निवडणुका होत आहेत. अहिल्यानगर मतदारसंघातून महायुतीकडे तोलामोलाचे उमेदवार आहेत. शेवटी उमेदवारीसंदर्भात कोअर कमिटी निर्णय घेणार आहे. महायुतीमध्ये जागा भाजपलाच मिळाली यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्याबाबत ते म्हणाले, की दिवंगत माजी आमदार अरुणकाका जगताप राष्ट्रवादी काँग्रेसकडून या जागेवर आमदार होते. मात्र, सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्यांच्या जागा जास्त त्यांना उमेदवारी असे सूत्र आहे. विधान परिषद मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदार भाजपचेच आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेवर भाजपचा दावा आहे. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. त्यात सत्यजित कदम, भानुदास बेरड, वसंत लोढा यांच्यासह राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक असलेले माजी खासदार सुजय विखे पाटील हेही इच्छुक आहेत. त्यावर कोअर कमिटी निर्णय घेईल, असे सभापती शिंदे म्हणाले.

तनपुरेंच्या नावावर चर्चा नाही

मंत्री माजी प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीच्या चर्चेसंदर्भात विचारले असात ते म्हणाले, त्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही कारण ते भाजपचे सदस्यही नाहीत. मात्र राहुरी विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्राजक्त तनपुरे यांची चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तनपुरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. तरीही विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही. मात्र, ते योग्य वेळ आल्यानंतर समजेल.

त्यांची राजकीय उंची वाढत चालली....

ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपमध्ये गेले तरी मी भाजपमध्ये जाणार नाही असे आमदार रोहित पवार म्हणाल्याचे समजले. त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता प्रा. राम शिंदे म्हणाले, की आज्याला नातू काय शिकविणार अशी अवस्था आहे. कर्जत-जामखेडच्या आमदारांची दिवसेंदिवस राजकीय उंची वाढत चालली आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत. त्यांनी काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT