नगर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बंडखोरीचे ‘शिर्डी’ मतदारसंघात तीव्र पडसाद उमटले. संगमनेरपाठोपाठ गुरुवारी कोपरगाव, अकोले तालुक्यातही शिवसैनिकांनी खासदार वाकचौरे यांचा जोरदार निषेध नोंदवला.
साईबाबांची शपथ मोडणाऱ्या वाकचौरेंना साईबाबा कधीच माफ करणार नाहीत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. दरम्यान, शुक्रवारी श्रीरामपूर येथे शिवसैनिकांकडून निषेध सभा घेतली जाणार असल्याचे ठाकरेसेनेकडून समजले.
वाकचौरे यांनी बुधवारी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्यासह शिवसैनिकांनी शिर्डीतील आंदोलन केले. वाकचौरे यांच्या निवासस्थानी गेले. मात्र तेथे पोलिस बंदोबस्त होता.
दरम्यान, वाकचौरे यांना शिर्डीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. बुधवारी संगमनेरात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. गुरुवारी अकोले, कोपरगावात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसले. तेथेही प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले.
वाकचौरेंसोबत कोण कोण चाललेय?
खा. वाकचौरे यांनी ठाकरे गटाला सोडल्यानंतर खा. संजय राऊत्त यांनी जिल्हाप्रमुख सचिन कोते यांच्याशी संपर्क साधून ‘कोण कोण चाललंय?’ याची माहिती घेतली. कोते यांनी एकही शिवसैनिक त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी ग्वाही देतानाच, शिवसैनिक वाकचौरे यांची शिर्डीत येण्याची वाट पाहत असून, तुडवातुडवी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितल्याचे समजते.
आम्ही गप्प बसणार नाही : सचिन कोते
अरविंद सावंत दोन दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. त्यांनी वाकचौरे सोडून जाणार नाहीत, असा विश्वास दिला होता. मात्र, आम्हाला माहिती होते ‘तो’ गद्दारी करणार आहे. कारण यापूर्वीही त्यांनी आमचा विश्वासघात केलेला होता.
आताही त्याची पुनरावृत्ती केली. साईबाबांची शपथ घेऊन ती मोडली. बाबा त्यांना माफ करणार नाहीत. मात्र, आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख सचिन कोते यांनी दिला.