श्रीरामपूरः देव अंगात संचारला, असे भासवून काही भोंदूबाबा भक्तांचे आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण करीत असल्याची चर्चा सध्या बेलापूरसह परिसरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गैरप्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या बाबांसंदर्भात तक्रारी असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अंनिस’च्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे, बाबा आरगडे व देविदास देसाई यांनी केले आहे.
‘अंनिस’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात ॲड. गवांदेंसह आरगडे व देसाई यांनी म्हटले आहे की, बेलापूरातील एका भोंदूगिरी करणाऱ्या बाबाने काही महिलांचे लैंगिक शोषण केल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. बाबांच्या भितीसह इज्जतीमुळे पिडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. आर्थिक व शारीरिक फसवणूक
झालेल्या महिलांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते अथवा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. भोंदू बाबाची भोंदूगिरी समाजासमोर उघड करुन, त्यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. भोंदूबाबाविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‘अंनिस’ने आक्रमक पावले उचलली आहेत.
भोंदूबाबाने भक्तांकडून मोठ्या रकमा वसूल केल्या आहेत, अशी चर्चा सुरु आहे. या बाबांकडे येणाऱ्यांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांचा समावेश आहे. पुढाऱ्यांच्या आश्रयाखाली बाबा महिलांचे लैंगिक शोषण करतो, अशी माहिती ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना मिळाली आहे. भोंदूबाबांचे कारनामे दडपण्यासाठी मदत करणाऱ्या पुढाऱ्यांची नावेदेखील उघड करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ‘अंनिस’ राज्य सचिव अँड. रंजना गवांदे, बाबा आरगडे, देविदास देसाई व छाया बंगाळ आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.