

वांबोरी: वांबोरी परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत हमीभाव केंद्रामध्ये मका विक्री करून तब्बल दीड महिन्याचा कालावधी उलटला, तरीही विक्री केलेल्या मक्याची रक्कम न मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. हमीभाव केंद्राच्या खरेदीदाराकडे दररोज मिन्नतवाऱ्या, विनवणी करूनही रक्कम बँक खात्यावर जमा होत नसल्यामुळे बळीराजा कमालीचा अस्वस्थ झाला आहे. हक्काची रक्कम कधी मिळणार, या अपेक्षेने मका उत्पादक शेतकरी ग्रासले आहेत. या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
राहुरी तालुक्याचे शासकीय आधारभूत मका हमीभाव खरेदी केंद्र (फेडरेशन) पाथर्डी तालुक्याकडे वर्ग केले आहे. यामुळे राहुरीतील मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाथर्डी येथील शासकीय आधारभूत हमीभाव केंद्रामध्ये मका विक्रीसाठी नोंदणी केली.
वांबोरीसह राहुरी तालुक्यातील कात्रड, गुंजाळे व खडांबे येथील शेतकऱ्यांनी पाथर्डी येथील हमीभाव केंद्रामध्ये जानेवारी महिन्यात मका विक्री केली. विक्री केल्यानंतर सुमारे आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होणे अपेक्षित होते.
तसा खुलासा फेडरेशन चालकांनी दिला होता, परंतू व्यवहाराची मुदत संपल्यानंतर मका विक्रे त्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे पैसे वर्ग न झाल्याबद्दल विचारणा केली असता, टोलवाटोलवीची उत्तर देण्यात आली.
सुमारे दीड महिना उलटला तरी, शेतकऱ्यांना हक्काचा व कष्टाचे मोबादला अद्यापपर्यंत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचे चिंता निर्माण झाली आहे. अडचणीसाठी मका विक्री केली ती, अडचण दूर होत नाही. अशातच लग्नसराईमुळे अनेकांनी आर्थिक गरजेपोटी मका विक्री केली, परंतू फेडरेशनच्या वेळ काढूपणा धोरणामुळे शेतकऱ्यांपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. या बिकट पार्श्वभूवीवर तत्काळ पेमेंट खात्यामध्ये वर्ग करावे, अशी मागणी संतप्त शेतकरी करीत आहेत.
चार महिन्यांपासून जिवापाड काळजी घेऊन उगविलेले पिक अडचणीवेळी आर्थिक आधार देईल. स्वतः खिशातून हजारो रुपये खर्च करून, मका पिक घेतले. पाथर्डी येथील हमीभाव केंद्रामध्ये विक्री करण्यासाठी भाडोत्री वाहन करून, पोहोच केल्यानंतर वाढदिवसात रक्कम मिळेल, असे वाटले, परंतू शासनाच्या मिन्नत वाऱ्या करूनही फेडरेशन चालकाकडून ‘तारीख पे तारीख’ देऊन, वेळ काढूपणा होत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी सूर उमटत आहे.
शाम भरसाकळ, शेतकरी, वांबोरी.
‘मका खरेदीसाठी राहुरी तालुक्यातून एकही संस्था पुढे न आल्यामुळे तालुक्याचे मका खरेदी केंद्र पाथर्डीला देण्यात आले. तेथील खरेदी मक्याची माहिती सरकारकडे कागदपत्रांद्वारे सादर केली, परंतू ऑनलाइन पोर्टलच्या नोंदी व सादर केलेली खरेदीची कागदपत्रे यामध्ये काही तांत्रिक त्रुटी राहिल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग झाली नाही. या आठवड्यात त्रुटी दूर करून, शासनाकडे शेतकऱ्यांच्या रकमेची मागणी करणार आहे. लवकरचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग होईल.
भारत पाटील, जिल्हा पणण अधिकारी.