Belapur Dam Water Dispute Pudhari
अहिल्यानगर

Belapur Dam Water Dispute: बेलापूर धरण परिसरात पाणी वाद चिघळला; बदगी गावची जलजीवन योजना रखडली

विहीर खोदण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध; प्रशासन पोकलँड व पोलिस बंदोबस्तासह माघारी परतले

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: अकोले तालुक्यातील बदगी गावच्या जलजीवन योजनेसाठी बेलापूर धरण क्षेत्रात विहीर खोदली जाणार होती. मात्र बेलापूर ग्रामस्थांचा यासाठी विरोध होता. तरीही, काल विहिरी खोदण्यासाठी प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात पोकलँड आणले होते. मात्र बेलापूर ग्रामस्थांची आक्रमकता पाहून हा वाद चिघळण्याची शक्यता होती.

त्यामुळे प्रसंगावधान राखत प्रशासनाने पोकलँड आणि पोलिस बंदोबस्त घेऊन पुन्हा परत जाणे पसंत कले. दरम्यान, पाणी उशाला अन्‌‍ कोरड घशाला अशी परिस्थिती झालेल्या बदगी ग्रामस्थांच्या पदरी मात्र या प्रकारामुळे निराशा पडल्याचे दिसले. बेलापूर व बदगी गावचे ग्रामस्थ पाणी प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. पठार भागातील बेलापूर धरणाच्या लाभक्षेत्रातील जाचकवाडी, पवारवाडी, गोपाळवाडी, मोघडवाडी, चैतन्यपूर, भक्ताचीवाडी गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे.

बेलापूर व कोटमारा धरणात पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यास प्रशासन कुचकामी ठरले आहे. अगोदरच धरणांनी तळ गाठला असून संबंधित गावे पिण्याच्या पाण्यासाठी कासावीस करत आहेत. कोट्यावधीं रुपयांच्या जल जीवन योजना निरुपयोगी ठरल्या आहेत. डोंगर दर्यात वसलेले बदगी गावची लोकसंख्या साधारण 1 हजार आहे. या गावासाठी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. येथील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहे. या गावासाठी 1 कोटी 69 लाखांची जलजीवन योजना मंजूर आहे.परंतु या योजनेचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाले असून अद्यापपर्यंत अर्धवट आहे.

या योजनेची विहीर बेलापूर धरणात खोदून गावापर्यंत पाणी नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असफल ठरला असून बदगी ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. दरम्यान, बदगी योजनेची विहीर बेलापूर धरणात खोदण्यास विरोध केला जात आहे. महसूल विभागाचे अधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी,पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी पोलिस बंदोबस्तात पोकलँड नेले होते. परंतु बेलापूर ग्रामस्थांनी घेतलेला आक्रमक पावित्रा पाहता हतबल प्रशासनास खाली हात परतावे लागले आहे.

बेलापूर ग्रामस्थांच्या नेमक्या मागण्या काय?

पाझर तलावाची मोजणी करून अतिक्रमण हटविण्यात यावे, चिल्हेवाडी, पाचघर, पिंपळगाव खांड, निळवंडे इ.धरणातून उपसा सिंचनाद्वारे बेलापूर पाझर तलावात उन्हाळ्यातील चार महिने पाण्याचे आवर्तन सोडावे, पिण्याच्या पाण्याची बेलापूरला टंचाई भासल्यास बदगी गावच्या पाणी योजनेच्या विहिरीत मोटार टाकण्याची अनुमती अथवा विहीर अधिग्रहण करण्यात यावी, गावचे जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेले काम तत्काळ पूर्ण करून वाडी_वस्ती पर्यंत पिण्याचे पाणी नेल्याशिवाय बदगी गावासाठी विहिर खोदण्यास जागा देऊ नये, सदर विहिरीच्या आजू बाजूस आडवे उभे बोअर मारू नये, काळू मांडवी नदी जोड प्रकल्प करून उपसा सिंचन योजनेतून कच नदी बारमाही करण्यात यावी.कच नदीवर विविध ठिकाणी तलाव,पाझर तलाव, केटीवेअर बांधून नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT