Banana Pudhari
अहिल्यानगर

Banana Export Iran War Impact: इराण युद्धाचा फटका; केळी निर्यात ठप्प

कर्जत परिसरातील बागायतदार अडचणीत; जवाहरलाल नेहरू पोर्टवर कंटेनरमध्ये माल अडकला

पुढारी वृत्तसेवा

खेड: अमेरिका-इराण-इस्राईल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे गंभीर पडसाद आता भारतीय शेतमलाच्या निर्यातीवर उमटले आहेत. इराणला होणारी केळी निर्यात अचानक बंद पडल्याने कर्जत तालुक्यातील खेडसह अनेक गावांतील बागायतदार अडचणीत सापडले आहेत.

खेड, आखोणी, शिंपोरा, भांबोरे, करपडी, गणेशवाडी, औटेवाडी, वायसेवाडी, करमनवाडी आदी उजनीच्या पाण्यावर यंदाच्या वर्षी सुमारे 225 एकर क्षेत्र केळी लागवडीखाली आले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर या भागातील अनेक व्यापाऱ्यांचा माल अडकलेला आहे. साधारणत: चाळीस कंटेनर अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (एका कंटेनरमध्ये 20 हजार किलो केळी असतात.) कर्जत परिसरातील केळी थेट इराण, सौदी अरेबिया, इराण, दुबई, अफगाणिस्तान, इराक, बहेरीन, कुवेत बाजारपेठेत जाते.

अनेक शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी करार करून बागा निर्यातीसाठी राखीव ठेवल्या होत्या. काहींनी आगाऊ रक्कमही स्वीकारली होती. मात्र युद्धजन्य परिस्थिती तीव्र झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी माल उचलण्यास नकार दिल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) येथे सुमारे हजार कंटेनर्समध्ये केळी व द्राक्षांचा माल अडकून असल्याची माहिती समोर आली आहे.

इराणमधील अब्बास बंदर येथे निर्बंध आणि युद्धाचा परिणाम झाल्याने जहाजांची ये-जा विस्कळित झाली आहे. या बंदरावरूनच मोठ्या प्रमाणावर भारतीय फळांची निर्यात होत असल्याने संपूर्ण साखळी थांबली आहे. परिणामी, काही शेतकऱ्यांचा माल अर्धवट विकला गेला आहे, तर उर्वरित केळी बागेतच पडून आहे. काहींचा माल काढणीच्या उंबरठ्यावर असून वेळेत तोडणी न झाल्यास गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. निर्यात बंद झाल्यामुळे स्थानिक बाजारात मालाचा ओघ वाढून दर घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

उत्पादन खर्च, मजुरी, पॅकिंग, वाहतूक आणि कर्जहप्ते यांचा ताण आधीच वाढलेला असताना या घडामोडींनी शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढवली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अडकलेल्या मालाबाबत मार्ग काढावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बागायतदारांकडून केली जात आहे.

केळीची बाग काढणीला तयार आहे. माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांशी बोलणीही झाली होती. मात्र अचानक त्यांनी थांबण्याचा निर्णय दिला. निर्यात नेमकी किती दिवस बंद राहील याची कोणतीही खात्री नाही. त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
आप्पासाहेब मोरे, केळी बागायतदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT