Ramnath Rajpure Attack Protest Pudhari
अहिल्यानगर

Ramnath Rajpure Attack Protest: बालमटाकळीतील माजी सभापती रामनाथ राजपुरेवर हल्ल्यानंतर ग्रामस्थांची निषेधसभा

गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना ताबडतोब अटक करा, अशी मागणी सर्व व्यापाऱ्यांनी केली

पुढारी वृत्तसेवा

बोधेगाव: कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी भ्याड हल्ला केला होता. या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी रविवारी (दि. 1) बालमटाकळी येथे सर्व व्यापाऱ्यांनी बंद पाळत ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीर निषेध सभा आयोजित केली होती. या वेळी आरोपींना तत्काळ अटक करावी; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मोहनराव देशमुख म्हणाले की, राजकारण आणि समाजकारण करताना आम्ही कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना थारा दिला नाही. मात्र, सध्या काळ बदलत असून, गावात वाढणारी गुन्हेगारी गंभीर चिंतेची बाब बनली आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या तरुणांचा तत्काळ बंदोबस्त करणे ही काळाची गरज आहे.

हल्लेखोरांना पोलिसांनी तत्काळ अटक न केल्यास बालमटाकळी येथे लवकरच रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला. या वेळी सरपंच डॉ. राम बामदळे, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, रामनाथ राजपुरे, मोहनराव देशमुख, भाजपचे नेते कासमभाई शेख, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष कमुभाई शेख, सेवा संस्थेचे संचालक रतनराव देशमुख, विक्रमराव बारवकर, भानुदास गलधर, हरिश्चंद्र घाडगे, मधुकर पाटेकर, विठ्ठल देशमुख आदी उपस्थित होते.

शंभर वर्षांची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा असलेल्या बालमटाकळीत सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. परंतु अलीकडे काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना स्थानिक पाठबळ मिळाल्याने अशा धाडसी घटना घडत आहेत.
मधुकर पाटेकर, सामाजिक कार्यकर्ते, बालमटाकळी
62 वर्षांच्या कार्यकाळात गावाच्या सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक प्रक्रियेत सक्रिय राहिलो. वाद-विवाद गावातच मिटवण्याची परंपरा जपली. मात्र, गेल्या दोन वर्षांत बाहेरून आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांंच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, पोलिस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कठोर कारवाई करावी.
रामनाथ राजपुरे, माजी सभापती, बाजार समिती, शेवगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT