संगमनेरः कोणी भगवी टोपी घातली म्हणजे लगेच हिंदुत्व येत नाही. उमेदवार होण्यापूर्वी कधी अशी टोपी घातली होती का, असा खोचक सवाल उपस्थित करुन, हे नाटक कशा करता सुरू आहे. अंतःकरणात वारकरी, हिंदुत्वाचा भाव महत्त्वाचा आहे. आम्ही हिंदू आहोत, पण कधी कोणाचा द्वेष केला नाही, मात्र सध्या संगमनेर तालुक्यात विष कालविण्याचे काम सुरू आहे.
अशांतता निर्माण केली जात आहे. संगमनेरच्या सहकारासह विकासावर गाढवांचा नांगर फिरविण्याचे काम केले जात आहे, असा घणाघाती आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांविरुद्ध केला. (Latest Ahilyanagar News)
किर्तनकार संग्राम भंडारे यांनी, बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी शहरातील नवीन नगर रोड, प्रांत कार्यालयासमोर आयोजित शांती मोर्चानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजित तांबे.
प्रभावती घोगरे, शिवसेनेचे संजय फड, काँग्रेसचे विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे, आरपीआयचे बाळासाहेब गायकवाड, सभापती शंकरराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, दिलीप पुंड आदी उपस्थित होते. यशोधन मैदानावर हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते. विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. सुमारे 20 हजार नागरिकांचा भव्य मोर्चा संगमनेरकरांनी अनुभवला. बाजार समिती, जय जवान चौक, सह्याद्री शाळा, शासकीय विश्रामगृह मार्गे मोर्चा प्रांत कार्यालयासमोर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी थोरात म्हणाले की, शांत व सुसंस्कृत संगमनेर तालुक्यात कोणताही वाद, भेद व संघर्ष नव्हता. बंधू भावाचे नाते होते. सर्व जाती, धर्म व पंथाचे लोक येथे गुण्या गोविंदाने आनंदाने राहत होते. विरोधक असले तरी, एकमेकांच्या सुख-दुःखात सर्वजण सहभागी होत होते. निवडणुका संपताच सत्ताधारी व विरोधक एकत्र बसून, चहा पिण्याची या तालुक्याची संस्कृती आहे, मात्र सध्या येथे जातीयतेचे विष पेरले जात आहे. वारकरी सांप्रदायाचा कोणताही जात, धर्म नाही. गरीब- श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही.
मानवधर्म हाच हरिभक्त सांप्रदायाचा धर्म आहे. साधू- संतांची शिकवण व सुसंस्कृती पुढे नेण्याच्या कार्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी एवढे घाणेरडे राजकारण कधी पाहिले नाही. सर्वांना बरोबर घेऊन आम्ही काम केले. स्व. भाऊसाहेब थोरात व बी. जे. खताळ पाटील या नेत्यांनी तालुक्यात शांतता ठेवण्यासाठी पुढाकार घेतला. आम्ही वारकरी आहोत, हिंदू आहोत, पण इतरांचा द्वेष करीत नाही.
घुलेवाडी येथील घटना व वस्तुस्थिती वेगळी आहे, परंतू विरोधकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्याचे काम केले आहे. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी कोणाच्या तरी हातचे बाहुले, हत्यार बनले आहे. त्यांची गुंडगिरी व दहशत मोडित काढण्यासाठी आता सर्वांना सामूहिक पद्धतीने पुढे येण्याची गरज आहे, असे थोेरात यांनी आवर्जून सांगितले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करुन, संगमनेर तालुका उभा केला. नवीन आमदाराने आमचे हिंदुत्व पाहू नये, असा सूचक सल्ला देत, ते म्हणाले की, तथाकथित कीर्तनकार नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण कोणी करीत असेल, तर हा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही. आम्ही वारकरी संप्रदायाचे व हिंदुत्ववादी आहोत. विरोधकांनी चार दिवसांपूर्वी मोर्चा काढला, परंतू त्यामध्ये खरे नव्हे तर, भाडोत्री लोक आणले होते, अशी खोचक टीका त्यांनी केली.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, संगमनेरातील तरुणांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे प्रकार आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. तोच विचार घेऊन, आपण पुढे जात आहोत.
‘लाव रे तो व्हिडिओ!’
घुलेवाडी येथील घटना ही पूर्व नियोजित षडयंत्र होते. या घटनेसाठी दहा दिवसांपूर्वीच नियोजन सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे जनतेला दाखविले आहेत. प्रत्येक आरोपाचे खंडन करीत, हे षडयंत्र कसे रचले गेले, कीर्तनकार संग्राम भंडारे कसे खोटे बोलत आहे. त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही. कीर्तनकार भंडारे व नवीन लोकप्रतिनिधींचे, षडयंत्र दाखविताना, ‘लाव रे तो व्हिडिओ,’ असे म्हणत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, उपस्थितांसमोर सर्व पुरावे सादर केले.