गॅझेटच्या आधारावर आरक्षण शक्य नाही: माजी मंत्री बाळासाहेब थोरात Pudhari
अहिल्यानगर

Balasaheb Thorat on reservation| गॅझेटच्या आधारावर आरक्षण शक्य नाही: माजी मंत्री बाळासाहेब थोरात

मराठा समाजाला न्याय मिळावा

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून मराठा समाजाच्या अपेक्षा पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे. आरक्षणाचा जीआर पाहिल्यानंतर संभ्रम व काळजी निर्माण होत आहे.

न्याय द्यायचा असेल तर ओबीसींच्या कोट्याला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्रपणे न्याय द्यावा, गॅझेटच्या आधारे आरक्षण देता येत नाही. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे, असे स्पष्ट मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. (Latest Ahilyanagar News)

सातारा गॅझेटवरून आरक्षणाचा प्रश्न निकाली लागणार नसल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारला याबाबत ठोस धोरण राबवण्याचे आवाहन केले. मराठा आरक्षणाचे आंदोलन थांबवण्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करताना थोरात म्हणाले की, हा अत्यंत परिपक्व व महत्त्वाचा निर्णय आहे. आंदोलन चिघळले असते तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाले असते. म्हणून त्यांनी महाराष्ट्राची, मुंबईची व सर्वसामान्यांची काळजी घेत आंदोलन थांबवले. ही त्यांची दूरदृष्टी आहे.

भुजबळांना असह्य होतेय

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा उल्लेख करताना थोरात म्हणाले की, ते पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्त्व आहेत. मात्र सध्या ते सरकारमध्ये असह्य मानसिकतेने काम करत आहेत. हे दु:खद आहे. भाजपचे ध्येय केवळ सत्ता हेच असून ते कोणतीही पद्धत वापरायला मागे हटत नाहीत.

सरकारचे अपयश स्पष्ट झाले

पक्षफोड, निवडणूक आयोगाचा ताबा, धर्माचा राजकारणात वापर, समाजात भेद निर्माण करणे हे लोकशाहीला अपूरक असल्याची टीका थोरात यांनी केली. राज्यातील रस्ते, ठेकेदार आत्महत्या करत आहेत. संजय निराधार योजना,श्रावण बाळ योजना अशा योजनांचे पैसे लाभार्थ्यांना वेळेवर मिळत नाहीत. हे सरकारचे अपयश आहे.

वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेत सर्व धर्म व सर्वपक्षीय लोक सहभागी होत असतात; मात्र भाजपने बोलघेवडे महाराज तयार करून वारकरी परंपरेचा अवमान केल्याचा आरोप थोरात यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT