

मंत्री विखे पाटलांचे निष्ठावंत मात्र आ. संग्राम जगताप यांच्याशी तितकीच सलगी असलेले निखील वारे यांचा भाजप प्रवेश अन् लगेच शहर जिल्हा सरचिटणीस पदाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गत लोकसभेला विखे पाटलांना चार हजारांचे मताधिक्य देणार्या प्रभाग 2 मध्ये भाजपचे ‘वारे’ जोमात असल्याची प्रचिती पदोपदी येते.
महायुती होणार की नाही हे अजून ठरायचे असले, तरी माजी नगरसेवक निखील वारे आणि बाळासाहेब पवार यांनी आतापासून वार्ड पिंजायला सुरुवात केली आहे. हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव पाहता महायुतीकडे इच्छुक अनेक असले तरी अंतिम निर्णय विखे-जगताप हेच घेतील, असे आजचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
प्रभाग रचनेत पूर्वीचा भाग कायम राहिला. गावडेमळा, लेखानगर आणि माऊलीनगर हा भाग नव्याने या वार्डाला जोडला गेला, हाच काय तो नव्या रचनेतील बदल. भाजपचे माजी युवक अध्यक्ष महेश तवले, माजी नगरसेवक उषाताई नलावडे याच वार्डात. यातील नलावडे यांनी आता तीन नंबर वार्डातून निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे निखील वारे यांच्यासोबत महेश तवले भाजपकडून इच्छुक आहेत.
बाळासाहेब पवार यांच्या पत्नी संध्या गतवेळी काँग्रेसकडून विजयी झाल्या होत्या. आता पुन्हा त्या इच्छुक आहेत, पण त्यांचा पक्ष कोणता हे अजून तरी ठरलेले नाही. आ.़ जगताप यांच्याशी असलेले नातेसंबंध आणि विखे पाटील यांच्याशी असलेले सख्य पाहता त्यांचा पक्ष ऐनवेळी ठरेल, असे आजचे चित्र आहे. विनीत पाऊलबुधे आणि सुनील त्र्यंबके हे माजी नगरसेवकही पुन्हा लढण्याच्या तयारीत आहेत.
भाजप आणि विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्वाची कट्टर भूमिका घेतलेले आ. संग्राम जगताप यांच्या राष्ट्रवादीसाठी अनुकूल अशी रचना झालेल्या या वार्डात इच्छुकांची मांदियाळी असल्याचे दिसते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फारसे प्राबल्य या वार्डात नाही. वारे आणि पवार हे दोघे नगरसेवक गतवेळी महापालिकेत काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करत असले तरी ते पक्ष म्हणून विजयी झालेले नव्हते, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. त्यामुळे काँग्रेसला येथून नवीन चेहर्याचा शोध घ्यावा लागणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला इच्छुकांची शोधाशोध करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, हे करूनही इच्छुक भेटतील की नाही, याबाबत आज तरी शंका आहे.
गतवेळी शिवसेनेकडून लढलेले वैभव सुरवसे हे आता भाजपात गेले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीवेळी याच वार्डातून डॉ. सुजय विखे पाटील यांना 4 हजारांचे, तर त्यानंतरच्या विधानसभेला आ. संग्राम जगताप यांना 4 हजार 200 चे मताधिक्य या वार्डातून मिळाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे भाजपच्या बरोबरीनेच आ. जगताप यांच्या राष्ट्रवादीसाठी हा वार्ड अनुकूल मानला जातो.
पद्मानगर आणि नित्यसेवा ही मोठ्या मतांचे पॉकेट ही निखील वारे यांच्यासाठी जमेची बाजू मानली जाते. या वार्डातील वारे हे एकमेव सतत जनसंपर्कातील नगरसेवक म्हणून परिचित झालेले आहेत. सहकारी नगरसेवक त्र्यंबके, पवार, पाऊलबुधे यांच्यापेक्षा वारे यांची कार्यपद्धती वेगळी आहे. विखे पाटील आणि आ. जगताप यांच्याशी असलेल्या संबंधातून वार्डात विकास कामांसाठी भरघोस निधी मिळाला, त्याचे सर्व श्रेय वार्डातील जनता निखील वारे यांनाच देते.
गतवेळी इच्छुक असलेले रवी गुडा आणि विशाल नाकाडे हेही पुन्हा लढण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी असेल. महायुती कायम राहणार की प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार, यावर बरेच काही अवलंबून असेल. आज तरी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पथ्यावर असलेली वार्डरचना दिसून येते. आता आरक्षण आणि त्यानंतर इच्छुकांतून ‘मैत्रीपर्व’ कोणाला संधी देणार याची उत्सुकता आहे.
महायुतीकडे रीघ, मविआची शोधाशोध!
गत निवडणुकीत विनीत पाऊलबुधे लढण्याच्या तयारीत नव्हते. आ. जगताप यांनी विजयाची खात्री दिल्यानंतर ते निवडणूक मैदानात उतरले. आताही ते सुरक्षितता पाहून मगच निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतात. सुनील त्र्यंबके पुन्हा लढण्याच्या तयारीत असले तरी स्वत: की कुटुंबातील सदस्य हे कळायला मार्ग नाही.
महायुतीकडे इच्छुकांची रीघ लागली तर महाविकास आघाडीला आतापासूनच उमेदवाराची शोधाशोध करण्याची वेळ आलीय. काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंची शिवसेना या वार्डावर नजर ठेवून आहे. त्यामुळे कोण कोणाच्या विरोधात लढणार? याची उत्सुकता कायम आहे.
एकला चालो.. सहकारी नंतर पाहू!
इच्छुकांनी आतापासूनच निखील वारे यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली; मात्र त्यांनी विखे-जगताप देतील त्याला सोबत घेऊ, इतकंच काय तर निवडूनही आणू अशी भूमिका घेत इच्छुकांना तिकडे जाण्याचा सल्ला ते देत आहेत. सहकारी कोण असतील, कोणत्या पक्षाचे असतील याचा विचार न करता निखील वारे यांनी ‘अकेला’ वार्ड पायाखालून घालण्यास सुरुवात केली आहे.