संगमनेर: संगमनेर तालुक्यावर सध्या दररोज नव-नवीन संकटे ओढवत आहेत. त्यांचा सामूहिकरित्या मुकाबला करावा लागणार आहे. येथील सहकार चळवळ मोडीत काढण्याचे षड्यंत्र विरोधकांकडून रचले जात आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे तरुणांची माथी भडकवून, राजकीय फायदा उठविला जात आहे.
कोणाच्यातरी इशाऱ्यावरून येथे सुडाचे राजकारण केले जात आहे, असा घणाघाती आरोप करुन, लाटेत निवडून आलेल्यांना जनभावना कळणार नाही, असा खोचक टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, आमदार अमोल खताळ यांचा नामोल्लेख न करता लगावला. (Latest Ahilyanagar News)
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग घुले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, रणजीत देशमुख, इंद्रजित थोरात, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले की, मोठ्या कष्टातून संगमनेरला पाणी मिळवून दिले. याकामी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे मोलाचे योगदान आहे. येथील माळरानावर साखर कारखाना उभा राहिला. या तालुक्यातील सहकारी संस्था केवळ तालुक्यातचं नव्हे, तर राज्यात अग्रेसर आहेत. सहकार व इथल्या संस्था जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
तरुण पिढीला या तालुक्याचा इतिहास माहिती नाही, मात्र आता तरुणांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन, चुकीच्या व खोट्या माहितीपासून दूर राहिले पाहिजे. गेल्या चाळीस वर्षात मी कधीही विश्रांती घेतली नाही. ‘आम्ही काय केले,’ असा प्रश्न कोणी विचारल्यास, याचे उत्तर जनतेने पुढे येवून दिले पाहिजे, असे आवाहन करुन, थोरात म्हणाले की, येथील विकास कामात अडथळा आणला जात आहे. प्रशासनदेखील विनाकारण अनेकांना त्रास देत आहे.
या तालुक्यातील शांतता टिकाऊ म्हणून सतत पुढाकार घेतला, मात्र आता जिरवा- जिरवीचे राजकारण सुरू झाले आहे. रोजगार, महागाई, शेतकरी आत्महत्या या गंभीर विषयांवर कुठलीही चर्चा होत नाही. महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
डॉ. तांबे म्हणाले की, संघर्षातून संगमनेर तालुक्याला 30 टक्के हक्काचे पाणी मिळाले. बाळासाहेब थोरातांनी निळवंडे धरण पूर्ण केले. निळवंडेचे 40 टक्के पाणी या तालुक्याला मिळत आहे. या कामातून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण केला आहे. आज संगमनेर मॉडेल देशभर आदर्शवत ठरत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी सदाशिव नवले, तात्याबा बोराडे, भास्कर वर्पे, संग्राम जोंधळे, अण्णा राहिंज, बाळासाहेब देशमुख, मोहनराव करंजकर या सभासदांनी मनोगत व्यक्त केली. एकरी जास्तीत- जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकरी बांधवांचा कारखान्याच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्वागत व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी, तर नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. इंद्रजीत थोरात यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, ऊस उत्पादक, महिला व युवक उपस्थित होते.
नकली ‘जलदूत’ पुढे आले!
निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांद्वारे दुष्काळी भागाला पाणी मिळवून दिले. धरणग्रस्तांचे आदर्श पुनर्रवसन केले. भोजापूर पूर चारीचे काम मी पूर्ण केले, मात्र काहींनी आयत्या पिठावर रेघा ओढण्याचे काम केले आहे. नकली ‘जलदूत’ पुढे आले आहेत. संगमनेरात तालुक्यातील दीडशे कोटी खर्चाची रस्त्यांची कामे विरोधकांनी रद्द केली. तीन योजना मी मंजूर केल्या, परंतू आता रद्द झाल्या आहेत. या सर्वांचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे, असा इशारा थोरातांनी दिला.
..तर राज्यात सर्वाधिक दर देवू..!
दरवर्षी कारखान्याचा गळीत हंगाम नव-नवीन आव्हाने घेऊन येतो, परंतू अडचणीतून मार्ग काढून, कारखाना सुरू आहे. नवीन कारखान्याची कमी वेळेत यशस्वी उभारणी करून, वीज व इथेनॉल निर्मिती केली. संगमनेर तालुक्यात उसाची कमतरता आहे. येथे 40 टक्केच ऊस उपलब्ध आहे.
60 टक्के ऊस बाहेरून आणून कारखान्याचा हंगाम पूर्ण करावा लागतो. तरीही दरवर्षी 15 लाख मॅट्रिक टनापर्यंत गाळप कले जाते. शेतकऱ्यांनी एकरी शंभर टन ऊस निर्मिती करावी. या कार्यक्षेत्रात स्वतःचा ऊस उपलब्ध झाल्यास, राज्यात सर्वाधिक दर देणार आहे. अडचणीतून मार्ग काढून पुढे जाण्याची आपली संस्कृती आजही कायम आहे, असे थोरात यांनी ठणकावून सांगितले.
‘त्यांचा’ वेळेत बंदोबस्त करावा
विधासाझ्या पराभवाची केवळ राज्यातचं नव्हे तर, संपूर्ण देशभर चर्चा झाली. अजूनही यावर काहींचा विश्वास बसत नाही, मात्र लाटेत निवडून आलेल्यांना, त्याचे महत्त्व कळणार नाही. आपले घर पेटल्यावर वेदनाही आपल्यालाचं होतात, मात्र अशाचा बंदोबस्त आता वेळेत केला पाहिजे, असा इशारा थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता दिला.