नेवासा: माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी गुरूवारी (दि. 6) मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. या प्रवेशामुळे तालुक्यात निश्चितच राष्ट्रवादीला बळकटी मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी असलेल्या बाळासाहेब मुरकुटे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून नेवासा मतदारसंघात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव करून आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीत मुरकटे यांचा पराभव झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करीत प्रहार पक्षाकडून उमेदवारी केली होती. त्यातही त्यांचा पराभव झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांनी तिरंगी लढतीत बाजी मारली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुरकटे यांची राजकीय भूमिका काय राहील, हीच चर्चा सतत होत होती. अनेक दिवसांपासून मुरकुटे पुन्हा भाजपत स्वगृही येथील, असेच सर्वाना वाटत असतांनाच नगरपंचायतीच्या निवडणूक तोंडावरच गुरूवारी (दि.6) मुरकुटे यांनी मुंबईत अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
तालुक्यात मुरकटेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशामुळे वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वस्वी धुरा युवानेते अब्दुल शेख यांच्यावर होती. नुकतीच जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीसंदर्भात आढावा बैठकही घेऊन महायुतीने नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये जागा न सोडल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले. आता माजी आमदार मुरकुटे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच बळकटी मिळणार आहे.
नगरपंचायत व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकरिता जागावाटपाची चर्चा महायुती मध्ये होत असतांनाच मुरकुटे प्रवेशाने अब्दुल शेख यांना पाठीराखा मिळाल्याची चर्चा होत आहे.
आणखी एका माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश?
नजिकच्या काळात तालुक्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा मेळावा घेण्यात येणार आहे. पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. पंरतु आतापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामाला लागले आहेत. तालुक्यातील आणखी एका माजी आमदारांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितल्याने नेवासा तालुक्यात वेगवेगळ्या राजकीय चर्चा होत आहे.