ढोरजळगाव : सध्या पूरसदृश्य परिस्थितीमुळे सर्वत्र हाहाकार माजला असून, सर्व रस्ते जलमय झाले आहेत. पुरात वाहने घालून अनेक वाहन चालक आपल्याबरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. असाच प्रकार शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथे घडला.दोघा तरुणांनी जीव धोक्यात घालत मोटारसायकलस्वारांचा जीव वाचला.(Latest Ahilyanagar News)
मंगळवारी (दि. 23) शेवगाव तालुक्यातील आव्हाने येथील अवनी नदीला पूर आला होता. डोंगरमाथ्यावर रात्री झालेल्या पावसाचे पाणी उशिरा नदीला आले. तोपर्यंत कामानिमित्त अनेकजण नदी ओलांडून पलीकडे गेले होते. परंतु सायंकाळी पाण्याचा प्रवाह वाढला नदीचे पात्र अरुंद असल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली. नदीच्या दुतर्फा बाजूने गर्दी झाली होती.
एवढ्यात भाजीपाला घेऊन अमरापूर येथे विकण्यासाठी गेलेले आव्हाने येथील शेतकरी रावसाहेब रंगनाथ डुरे ( वय 68) आणि त्यांचा मुलगा अशोक रावसाहेब डुरेे ( वय 48) सायंकाळी 5 वाजता घराकडे येत असताना घराच्या ओढीने पाण्यात घुसले. पाण्याच्या प्रचंड वेगाने मोटरसायकल घसरून दोघे पाण्याबरोबर वाहू लागले.
पुलापासून 100 फूट अंतरावर वाहत गेल्यानंतर एका बाभळीच्या फांदीचा आधार त्यांना मिळाल्यानंतर एकमेकांच्या हाताला हात धरीत ते स्वतःला वाचविण्यासाठी ओरडू लागले. यावेळी तरुण बन्सी रामभाऊ वाघमारे व मंगेश गंगाधर आहेर यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचविण्यासाठी नदीपात्रात उडी घेतली. दोरखंडाच्या साह्याने दोघांच्या कमरेला बांधून सुरक्षितपणे बाहेर काढले. यावेळी मोटरसायकल मात्र वाहून गेली. धाडस दाखविल्याबद्दल या तरुणांचे कौतुक होत आहे.