Attack on government official
नगर: माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी महावितरणच्या सहायक अभियंत्यास आणि बाळासाहेब बोराटे यांनी महापालिका आरोग्य अधिकार्यास धक्काबुक्की केल्याच्या दोन घटना गुरुवारी अहिल्यानगर शहरात घडल्या. कोतकरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला, तर बोराटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
न कळविता केडगावच्या लोंढे मळा परिसरात ड्रिस्टीब्युशन बॉक्स बसविल्याच्या रागातून माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर चारचाकी वाहन घातल्याची तक्रार कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आली आहे. केडगाव सबस्टेशनमध्ये बुधवारी ही घटना घडली. (Latest Ahilyanagar News)
राहुल सीताराम शिलावंत यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ते महावितरणमध्ये सहायक अभियंता आहेत. केडगाव सब स्टेशनमध्ये असताना बुधवारी सायंकाळी त्यांना मनोज कोतकर यांचा फोन आला.
लोंढेमळा, खंडोबा मंदिर येथे ड्रिस्टीब्युशन बॉक्स मला न सांगता, न बोलावता तुम्ही कसा काय बसवला, अशी विचारणा करत त्या कामाचे श्रेय दुसरे लोक घेत असल्याचे ते म्हणाले. फोनवरच त्यांनी शिवीगाळ करण्यास केली. त्यानंतर मनोज कोतकर इनोव्हा कारने सबस्टेशन येथे आले. त्यांनी कार्यालयाबाहेरच भरधाव वेगात कार चालवीत अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महवितरणचे वैभव दिलीप निकम व पोपट शंकर सातपुते यांनी वेळीच सावरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तुला सोडणार नाही, तुम्हाला सर्वांना पाहून घेतो, अशी धमकी कोतकर यांनी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील राहिंज यांच्या सूचनेनुसार तक्रार देण्यात आली आहे.
डॉ. राजूरकर यांनाही धक्काबुक्की
दरम्यान, दुपारी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर यांनाही माजी नगरसेवकाकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.18) महापालिका कर्मचारी युनियनच्या वतीने प्रभाग कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे.
सकाळी साडेदहा वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सचिव आनंद वायकर यांनी केले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.