श्रीरामपूर: अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सोमवारी अध्यक्ष भानुदास मुरकुटे यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना भाषण करण्यापासून रोखल्याने गोंधळ उडाला. बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सभात्याग करत सभागृहाबाहेर निषेध सभा घेतली.
अशोक कारखान्याची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी कारखान्याच्या मंगल कार्यालयात झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष भानुदास मुरकुटे होते. या सभेत विविध विषय मंजूर झाल्यानंतर प्रताप पवार बोलण्यासाठी उठले असता, अध्यक्ष मुरकुटे यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला आणि दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. (Latest Pune News)
दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. मुरकुटे म्हणाले हे लोक कारखाना बंद पाडण्याची सुपारी घेऊन आले आहेत. कोणत्याही कारखान्याने 3500 रुपये भाव देण्याबाबत हमी दिलेली नाही. कामगारांचे पगार थकले ते आम्ही देणार आहोत तुम्ही नाही, असे खडसावून सांगत त्यांना त्यांच्या जागेवर बसविले.
ते म्हणाले, की 365 दिवस हे गृहस्थ अमेरिकेत असतात. आज येथे आलेत. मुळा, ज्ञानेश्वर, प्रवरा या कारखान्यांनी कुणीही भाव अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळे अशोककडे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. जे दारू तयार करतात त्यांच्या एवढा भाव आपण देऊ शकत नाही. आपण कर्ज काढून शिक्षण संस्था आणि विविध प्रकल्प सुरू केले. कामगारांना 8 महिन्याच्या पगार देऊ शकलो नाही कोणताही कारखाना बिनकर्जाचा नाही. सगळ्यावर 300 ते 400 कोटी कर्ज आहे. काही लोक भाव देत नाही म्हणून चिथावणी देतात.
तुम्ही 3500 भाव द्या आम्ही राजीनामे देतो, आमचा मोठा त्याग आहे. कुणाची सुपारी घेऊन तुम्ही आलात. आम्ही सर्व राजीनामे देतो. तुम्ही ताब्यात घ्या. हा कारखाना बंद पडला तर चालू होऊ शकत नाही. शिक्षण संस्था या कारखान्याच्या मालकीच्या ठेवल्या. इतर कारखान्याचे तसे नाही. दोन वर्षांनी निवडणूक आहे. आम्ही चुकीचे वाटत असेल सभासद आमचं काय करायचं ते ठरवतील.
प्रताप भोसले म्हणाले की, माझ्यावर मुरकुटे यांनी वैयक्तिक आरोप केले. मी 3500 भाव देतो तुम्ही चेअरमन राहा. व्यवस्थापन माझ्या ताब्यात द्या. असे आव्हान त्यांनी दिले.ॲड. अजित काळे कारखान्यातील गैरव्यवहाराबाबत बोलू लागताच मुरकुटे यांनी त्यांना बोलू देण्यास नकार दिला. माईक बंद करण्यात आला.
या वेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मुरकुटे समर्थक स्टेजवर आल्याने एकच गोंधळ उडाला. एकमेकांना ढकलाढकली करत धक्काबुक्कीवर आले. नंतर लाईटही बंद करण्यात आली. ॲॅड. अजित काळे व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी मुरकुटे यांचा निषेध करत सभास्थळ सोडले आणि बाहेर येऊन निषेध सभा घेतली.