नगर: महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 11 मंडळांनी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. ‘जय भीम’च्या गर्जनेने आसमंत दुमदुमून गेला. मिरणुकीत तरुणांची अलोट गर्दी पाहायला मिळाली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज दिवसभर मार्केट यार्ड चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी समाजबांधवांनी गर्दी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुरेश बनसोडे यांच्या पुढाकारातून विविध कार्यक्रम झाले. अभिवादनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
निळी टोपी, निळा पंचा अन् निळा झेंडा
हातात निळे झेंडे, गळ्या निळा गमजा आणि डोक्या निळी टोपी असा पोषाखात तरुणाई मिरवणुकीत सहभागी झाली होती. डीजेच्या तालावर आणि भीम गीतांच्या बोलावर तरुणाई थिरकताना दिसली.
मिरवणुकीत सहभागी मंडळे
दुपारी निघालेल्या मिरवणुकीत सिद्धार्थ ग्रुप बालिकाश्रम रोड, कॅम्प कौलारू मित्रमंडळ सर्जेपुरा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सावेडी, नीलक्रांती मित्रमंडळ नगर शहर, मिलिंद तरुण मंडळ, मंगलगेट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, सिद्धार्थनगर, भारतीय बौद्ध महासभा, पँथर ग्रुप सिद्धार्थनगर, एनकेएमएम ग्रुप, नीलक्रांती चौक, वर्ल्ड किंग ग्रुप माळीवाडा, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी मंडळे सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्केट यार्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा वेस, फुलसौंदर चौक, पंचपीर चावडी, तक्ती दरवाजा, माणिक चौक, कापड बाजार, तेखीखुंट रात्री उशिरा मिरवणुकी चितळे रस्त्यावर होती. पोलिसांनी मिरवणूक मार्गावर बॅरिकेडिंग केली होती. सर्वत्र चोख बंदोबस्त होता.
पुतळ्याजवळ दिवसभर गर्दी
मार्केट यार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात दिवसभर समाज बांधवांची गर्दी होती. शहरासह ग्रामीण भागातील समाज बांधव अभिवादन करण्यासाठी आले होते. दरम्यान, 14 एप्रिलच्या मध्यरात्री 12 नंतर मार्केटयार्डसमोरील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
चौकाचौकात पुतळे
शहरातील विविध भागात चौकाचौकात पहिल्यांदाच भीमजयंती साजरी करण्यात आली. अनेक ठिकाणी मोठे स्टेज उभारून डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा मांडण्यात आला होता. दिवसभर बाबासाहेबांच्या गीतांनी परिसर भीममय झाला होता.