तनपुरे साखर कारखाना  Pudhari
अहिल्यानगर

Tanpure Factory Election : तनपुरे कारखान्यासाठी ‘सोळा’ तारीख मोक्याची

Tanpure Factory Election निवडणूकबिनविरोध होणार का याकडे लक्ष; 173 इच्छुकांपैकी माघार कुणाकुणाची?

पुढारी वृत्तसेवा

Tanpure Factory Election in Ahilyanagar

रियाज देशमुख

राहुरी : राहुरी परिसरासाठी कामधेनू ठरलेल्या तनपुरे कारखान्याचे भवितव्य ठरविण्यासाठी निर्णायक असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 173 इच्छूक उमेदवारीच्या तयारीत आहेत. माघारीची 16 तारीख अंतिम आहे. अद्याप एकानेही माघार घेतलेली नाही. त्यामुळे बिनविरोधची आशा धूसर दिसत असतानाच, दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या पडद्यामागील हालचाली वाढल्या आहे. त्यामुळे माघारीनंतर दुरंगी की तिरंगी लढत रंगणार, याकडे लक्ष असणार आहे.

राहुरी येथील तनपुरे कारखान्याची निवडणूक जाहिर होताच विधानसभेपासून थंडावलेले राजकीय धुराडे पुन्हा पेटले. 21 संचालक पदासाठी तब्बल 180 जणांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 173 अर्ज वैध घोषित करत निवडणूक प्रशासनाने आठवड्यापासून माघारीची संधी दिली. आठवडा उलटत असतानाही एकही इच्छुकाने माघारीचा निर्णय घेतलेला नाही. अर्ज माघारीसाठी आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने घडामोडी वाढल्या आहेत. एकाही इच्छूक उमेदवाराने अर्ज माघारीचा निर्णय न घेतल्याने सर्वांचे लक्ष 16 मे रोजी माघारीच्या शेवटच्या दिवसाकडे लागलेले आहे.

तनपुरे कारखान्यासाठी भाजपकडून आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनात विखे-कर्डिले गटासह भाजप मित्र पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. दुसरीकडे तनपुरे गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे मैदानात उतरलेले आहे. तनपुरे यांनी बाजार समितीमध्ये आदर्शवत कार्य करीत सहकारात नावलौकिक मिळविलेला आहे. तनपुरे कारखान्यालाही गतवैभव मिळवून देण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू करण्याचा मनसुबा आखत रणशिंग फुकले आहे. संभाजी प्रतिष्ठाणचे राजूभाऊ शेटे यांनीही निवडणुकीत दमदार उमेदवार देण्यासाठी बांधणी केली आहे. तर कारखाना बचाव कृती समितीने गटा-गटात बैठका सुरू करीत कारखाना सुरू करण्याबाबत सभासद, कामगारांपुढे आपली आगामी व्यूवहरचना मांडण्यास प्रारंभ केला आहे.

दरम्यान, सोशल मीडियामध्ये मागिल सत्ता काळामध्ये झालेल्या कामकाजाची माहिती देत तनपुरे कारखान्याला झालेल्या कोट्यवधी रुपयांचे नुकसान मांडले जात आहे. तर कारखाना आमचाच नेता कसा सुरू करणार हे दाखविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सोशल मीडियामध्ये जीवाची बाजी लावण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये कार्यकर्त्यांची पेटलेली राजकीय धुळवड आगामी काळात राहुरीच्या राजकारणाचे धुराडे पेटवायला महत्वाचे ठरणार आहे. तनपुरे कारखान्याच्या सभासदांची यादी घेऊन इच्छूक उमेदवारांच्या गाठीभेटी सुरू झालेल्या आहेत.

सुमारे 30 लाखांची रक्कम जमा

तनपुरे कारखाना निवडणुकीत उतरण्यासाठी इच्छूक उमेदवारांना सभासद शेअर्स रक्कम भरणे महत्वाचे होते. मोठ्या प्रमाणात इच्छूक असल्याने सभासद शेअर्स रक्कम मोठ्या प्रमाणात जमा झाली. सुमारे 30 लाखाची रक्कम जमा होऊन त्याचा लाभ कारखाना कामगारांना होईल, अशी अपेक्षा लागलेली आहे.

कदम यांच्या आजच्या बैठकीकडे लक्ष

तब्बल 4 पॅनलच्या माध्यमातून राजकीय नेते तयारी करीत असल्याने इच्छूकांची संख्या मोठी ठरत आहे. कारखाना बिनविरोध व्हावा असे सांगत देवळाली प्रवरेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी बैठकीची घोषणा केली आहे. परंतु त्या बैठकीला कोणते राजकीय नेते सहमती दर्शवतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सात गटातून 21 संचालक निवडले जाणार

कोल्हार गटामध्ये 25 गावे असून 3 हजार 172 सभासद आहेत. देवळाली प्रवरा गटामध्ये 12 गावे असून 3 हजार 417 सभासद संख्या आहे. टाकळीमिया गटामध्ये 15 गावे असून 3 हजार 592 सभासद आहे. आरडगाव गटामध्ये 11 गावे असून 3 हजार 725 सभासद आहेत. वांबोरी गटामध्ये 17 गावे समाविष्ट असून 3 हजार 448 सभासद आहे. राहुरी गटामध्ये 12 गावे असून 3 हजार 739 सभासद असून कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 92 गावांतून 21 हजार 93 इतकी सभासद संख्या आहे. तर ब वर्ग गटामध्ये सेवा संस्था प्रतिनिधी 190 आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT