अकोले: तालुक्यातील लिंगदेव येथे चार अवैध दारुचे अड्डे महिलांनी गुरुवारी उध्वस्त केले. या घटनेमुळे अजुनही तालुक्यात दारू विक्री सुरूच असून लवकरात लवकर दारू हद्दपार न झाल्यास दि. 15 ऑगस्टपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दरूबंदी चळवळीचे प्रणेते हेरंब कुलकर्णी यांनी दिला आहे.
अकोले व राजूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पंचवीस-तीस गावांत राजरोस अवैध दारूविक्री सुरू आहे. संगमनेर, शेंडी, ठाणगाववरून दारूची वाहतूक उघडपणे होते. वीरगाव फाटा, इंदोरी फाट्यावरून दारू पाठविली जाते. (Latest Ahilyanagar News)
तालुक्यातील ज्या गावांत दारू विकली जाते त्या गावांची हातभर यादीच हेरंब कुलकर्णी यांनी नुकतीच तहसीलदारांसमोर ठेवली. संगमनेर येथून रोज रात्री दारूच्या गाड्या येताना स्थानिक पोलिसांसह उत्पादन शुल्क विभाग त्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल त्यांनी केला.
तालुक्यात गुटखा पकडल्यावर गुटखा विकणार्या दुकानदारांकडून पैसे गोळा केल्याच्या अकोल्यातील प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करुन इंदोरीतील दोन गुन्हेगारांवर आता गुन्हा दाखल करतील का ? डस्टर 101 या गाडीची दारू वाहतूक करते म्हणून लायसन रद्द करतील का ? संगमनेर येथून येणारी दारू आणि शेंडी येथून येणारी दारू वाहतूक थांबेल का ? असे प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केले आहे.
यावेळी तहसीलदारांनी या सर्व तक्रारी अतिशय गंभीर असून पुढील आठ दिवसांत या सर्व गावांतील दारू विक्री पूर्ण थांबली पाहिजे आणि संगमनेर येथून येणारी दारू रोखण्याची सुचनाही तहसीलदार मोरे यांनी अकोले पोलिस निरीक्षक बोरसे, राजूर पोलिस निरीक्षक दीपक सरोदे, संगमनेर उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक अधिकारी सुनील सहस्त्रबुद्धे यांना केल्या.
या बैठकीला तहसीलदार सिद्धार्थ मोरे, अकोले पोलिस निरीक्षक बोरसे, राजूर पोलिस निरीक्षक सरोदे, उत्पादनशुल्क निरिक्षक सुनील सहस्त्रबुद्धे, गटविकास अधिकारी अमर माने, अशासकीय सदस्य हेरंब कुलकर्णी उपस्थित होते.
साहेब, तर आम्ही आमचे जीवन संपवू!
लिंगदेव गावातील चार पेक्षा अवैध दारू अड्डे रणरागिणींनीनी उद्वस्त केले आहेत. वर्षभरात 12 ग्रामसभेत 12 वेळी दारूबंदीचे ठराव झाले. साहेब... जर पुन्हा ही दारू विकली गेली तर आम्ही स्वतः आमचे जीवन संपवू तसेच ज्यांना दारू विक्री करायची असेल तर आमचे पती व मुलांना सांभाळा, अशी आर्तहाक दिली.तर सुखाच अन्न आमच्या पोटात जात नाही, ह्या दारूने आमचे जगन असह्य झाले आहे, अशा वेदनादायी भावना लिगदेवमधील महिलांनी व्यक्त केल्या.
दारु विक्रेत्यावर 302 चा गुन्हा दाखल करा
इंदोरी फाटा येथील दोन व्यक्ती संपूर्ण तालुक्यात दारू विकतात. हे सातत्याने आम्ही प्रशासनाला सांगत आहोत. तर इंदोरी येथील एक जण दारूचे खोके उतरवताना दिसत आहे व डस्टर वाहन रोज दारू वाहते.
हे दोन गुन्हेगार रोज ठाणगाव येथून गाड्या भरून खिरविर, समशेरपूर कोंभाळणे, पिंपळगाव नाकविंदा, शेरणखेल, पाडाळणे, कोतुळ, लिंगदेव, लहित इथे दारू पुरवठा करतात. अवैध दारु विक्रेता सचिन जाधव याच्या हॉटेलमध्ये एक जण दारू पिऊन मयत झाला. ती तक्रार दडपली गेली. त्या व्यक्तीच्या पत्नीला बोलावून पुन्हा चौकशी करण्याची गरज आहे. तसेच विषारी दारू विकून मृत्यू झाला म्हणून सचिन जाधव वर 302 दाखल करावा, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली.