Akole New ST Buses Pudhari
अहिल्यानगर

Akole New ST Buses: अकोले आगारात 5 नव्या ‘राजमाता जिजाऊ’ एसटी दाखल; पावसाळ्यातील गळक्या बसांच्या त्रासाला ब्रेक

आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठपुराव्याला यश; आणखी 10 मिनी बस लवकरच सेवेत, प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची हमी

पुढारी वृत्तसेवा

अकोले: राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोले आगारात हळू-हळू तब्बल नवीन ५ एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस अतिशय सुस्थितीत असल्यामुळे ‘टीप- टीप बरसा पानी’ या गाण्याची उपहासात्मक फिलिंग काहीसी कमी झाली आहे. यापूर्वी एसटीला पत्र्याची बॉडी असल्यामुळे पावसाळ्यात छतातून पाणी गळत असे. यामुळे एसटी प्रवास जणू वैताग वाटायचा, परंतू या बिकट समस्येची दखल घेत, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पाठपुराव्यामुळे ५ राजमाता जिजाऊ बसेसचे लोकार्पण अकोले छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकात करण्यात आले.

राज्य मार्ग परिवहन महामंडळ कित्येक दिवसांनंतर कात टाकत आहे. सुरुवातीस ई-शिवाई बसेस आल्या. त्या पाठोपाठ जिजाऊ ही नवीन बस आली आहे. या बसेसची बांधणी उत्तम दर्जाची आहे. साहजिकच गाड्यांचा नेहमीचा खडखडाट आता बंद झाला आहे. पूर्वी गाडीची बांधणी पत्र्यांमध्ये केली जात असे. पत्रे जोडण्यासाठी रिबिट ठोकले जात होते. रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने पत्रे निखळत असे.

यामुळे रिबिटच्या ठिकाणचा गॅप वाढल्याने पावसाळ्यात पावसाचे पाणी बसमध्ये टिपकत असे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असे, परंतू आमदार डॉ. किरण लहामटे यांनी, अकोले बस स्थानकाचे सुसज्ज नूतनिकरण करून छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाला नवीन १० बसेस उपलब्ध करून दिल्या. यापैकी ५ राजमाता जिजाऊ बसेसचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे आता जवळ-जवळ 'टीप- टीप बरसा'ला ब्रेक लागणार आहे.

समस्या होणार इतिहासजमा!

अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस पडतो. याही परिस्थितीत एसटी सामना करीत प्रवासी सेवा बजावते, परंतू काही वर्षांपूर्वी एसटी पत्र्यांची असे. यामुळे छतातून पावसाचे पाणी आत पडायचे. काही खिडक्यांची दुरवस्था झाल्याने खिडक्यांना काचा बसत नसे. काही बसेसला काचाही नसत. यामुळे पावसाचे पाणी थेट अंगावर पडायचे. अशा खिडकी शेजारी बसणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत असे, परंतू ही समस्या आता इतिहासजमा होणार आहे.

गळक्या बसेसला अधिकारी जबाबदार!

राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी आदेश दिले होते. त्यामध्ये प्रवाशांना चांगली सेवा देण्याची हमी देतानाच गळकी एसटी आढळली किंवा पावसाचे पाणी एसटीत पडल्याने प्रवाशांना त्रास झाल्यास, यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. त्याप्रमाणे अशीच घटना घडली असता, एसटीतील एका प्रवाशाने चित्रिकरण करुन, फोटो काढून ते वरीष्ठांकडे पाठवले अन् याप्रकरणी एसटीच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती.

अकोलेतील छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानकाला आत्तापर्यंत तब्बल १५ एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. येत्या काळात आणखी १० मिनी बसेसे अकोले आगारात दाखल होणार आहेत. यामुळे प्रवाशांना अधिक सक्षम, सुरक्षित व सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होईल. या बसस्थानकाच्या भौतिक सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करुन, प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी व सुखकर करण्याचे आमचे ध्येय आहे.
आमदार डॉ. किरण लहामटे, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT