Crime Pudhari
अहिल्यानगर

Akole Crime: दारूच्या वादातून एकाचा खून; मृतदेह धरणात फेकला, महिनाभराने गुन्ह्याचा पर्दाफाश

अकोले तालुक्यातील धामोडी फाटा येथील धक्कादायक घटना; चौघांविरुद्ध गुन्हा, पोलिसांकडून अटकसत्र

पुढारी वृत्तसेवा

अकोले: तालुक्यातील धामोडी फाटा येथे हॉटेलवर दारूच्या कारणावरून नेहमी भांडण करणाऱ्या एकाला हॉटेलचालकाने साथीदाराच्या मदतीने कायमचे संपवले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पिंपळगाव खांड धरणात फेकून दिला.. तब्बल महिनाभरानंतर खुनाची ही घटना उघडकीस आली.

मच्छिंद्र ऊर्फ सचिन किसन वाकचौरे (वय ३७, रा. पिंपळगाव निपाणी, ता. अकोले) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, आरोपींमध्ये सचिन सुदाम जाधव (रा. नवलेवाडी, ता. अकोले), दिगंबर रामनाथ रोकडे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), संदेश लक्ष्मण उघडे (रा. विठे, ठाकरवाडी, ता. अकोले) आणि श्रीकांत राजेंद्र डोंगरे (रा. राजापूर रोड, बुळकुंडे मळा, ढोलेवाडी, ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

अकोले पोलिस ठाण्यात मृताचा भाऊ पोपट किसन वाकचौरे (रा. पिंपळगाव निपाणी) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे, की भाऊ मच्छिंद्र याचे सचिन सुदाम जाधव याच्या दारूच्या दुकानात अनेकदा वाद होत होते. त्याचा राग मनात धरून दि. २६ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ते (दि. ७) ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान, धामोडी फाटा येथे सचिन जाधव, दिगंबर रोकडे, संदेश उघडे, श्रीकांत डोंगरे यांनी मच्छिंद्रला मारहाण केली. नंतर जीपमधून नेऊन त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचे कपडे काढून मृतदेह सुती दोराने बांधून पिंपळगाव खांड धरणात फेकून दिला.

अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी (दि. ७) तीन आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना बुधवारपर्यंत (दि. १२) पोलिस कोठडी सुनावली. आरोपी डोंगरे याला पोलिसांनी शनिवारी (दि. ८) दुपारी अटक केली.

दरम्यान, पिंपळगाव खांड जलाशयात मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सचिन जाधव हा अवैध दारूविक्रीचा व्यवसाय करत असून त्याच्यावर २० विविध गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT