Ghatghar Health Centre Pudhari
अहिल्यानगर

Ghatghar Health Centre: उद्‌घाटनापूर्वीच आरोग्य इमारतीला गळती; घाटघर येथील गंभीर प्रकार समोर

लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष

पुढारी वृत्तसेवा

अकोले: अहिल्यानगर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अकोले तालुक्यातील घाटघर येथील आरोग्य पथकांच्या नवीन इमारतीला उद्‌घाटनापूर्वीच गळती लागल्यामुळे संतप्त सूर उमटला आहे. याबाबत लोक प्रतिनिधींसह प्रशासानाचे दुर्लक्ष झाल्याची ओरड ऐकू येत आहे.

‘ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम’च्या गलथान कारभारामुळे सुमारे १ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीला गळती लागल्याने नवीन इमारतीच्या कामाबाबत उद्घाटनापूर्वीचं प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. दरम्यान,गळक्या इमारतीत रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आली आहे.

जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या आदिवासी अकोले तालुक्यातील घाटघरची लोकसंख्या १ हजार ३०० आहे. वाड्या- वस्त्या व आश्रम शाळेतील २५० विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखभालीची जबाबदारी घाटघर आरोग्य पथकावर अवलंबून आहे.

तालुक्यातील आदिवासी अति दुर्गम भागात आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. घाटघर येथे आरोग्य पथक असल्याने रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत १ कोटी ६८ लाख रुपये मंजूर करण्यात आले.

त्यामध्ये सुसज्ज इमारत, वैद्यकीय अधिकारी रुम, रिचारिका रुम, प्रसूती ग्रह, ऑपरेशन रुम, औषधोपचार आदी सुविधा उपलब्ध केल्या.२०२३ जुलैमध्ये भर पावसात आमदार डॉ. किरण लहामटे यांनी या नुतन आरोग्य केंद्राच्या इमारत कामाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली होती. बांधकाम दर्जाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या, मात्र अधिकारी व ठेकेदाराने लोकप्रतिनिधींच्या या सूचनेलाचं ठेंगा दाखविल्याचे वास्तव चित्र दिसत आहे.

काही पत्रकारांनी घाटघर प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारतीला भेट दिली असता, ऑपरेशन थिएटर, रुग्ण तपासणी कक्ष, औषधे कक्षासह सर्व इमारत गळत असल्याचे विदारण चित्र दिसले.

याबाबत साबां उप अभियंता सुंदरराव घुगे यांच्याशी संपर्क साधला असता, घाटघर आरोग्य पथकांच्या इमारतीला भेट देऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र घाटघर आरोग्य पथकाचे काम तत्काळ दर्जेदार पूर्ण करुन, रुग्णांना चांल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जिप सार्वजनिक बांधकाम विभागाने याप्रश्नी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रभारी डॉक्टर दोनचं दिवस

अकोले तालुक्यापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावरील पुनर्वसन झालेल्या घाटघर प्राथमिक आरोग्य पक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्याची बदली झाली आहे. यामुळे घाटघर पथकाचा तात्पुरता पदभार डॉ. उघडे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्यात मंगळवार व गुरुवार हे दोनचं दिवशी ते घाटघर येथे रुग्ण तपासणीसाठी येतात, मात्र चार दिवस आरोग्य सेविका आणि औषध निर्माता रुग्णांवर प्राथमिक उपचार करतात.

भर पावसात न्यावे लागते उपचाराला

पावसाचे दिवस असल्याने सर्दी, खोकला, जुलाब, थंडी, ताप अशा समस्या उद्भवतात. दोन-तीन किलोमीटर अंतरावर निवासी शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेतात. येथील विद्यार्थी आजारी पडल्यास घाटघर येथे डॉक्टर उपस्थित नसल्यास शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी भर पावसात त्यांना न्यावे लागते. याकडे आमदार डॉ. किरण लहामटे, सिओ आंनद भंडारी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT