नगर : मोबाईल टॉवर, व्यावसायिक मालमत्ताधारक व मोकळ्या भूखंडधारकांसह मालमत्ता व पाणीपट्टी कराची थकबाकी पावणेतीनशे कोटीवर पोहचली आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी चारही प्रभाग कार्यालयांची बैठक घेत महिनाभरात 45 कोटी वसुलीचे टार्गेट दिले आहे. वसुलीत कसर केल्यास कारवाईचा इशारा देतानाच थकबाकीदारांचे भूखंड, मालमत्ताजप्तीचे आदेशही डांगे यांनी दिले आहेत.(Latest Ahilyanagar News)
थकबाकी न भरणाऱ्यांचे मोकळे भूखंडधारक व व्यावसायिक मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात येणार असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तमाफी होणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत महापालिकेत करवसुली व थकबाकीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी व्यावसायिक मालमत्तांची थकबाकीच जास्त असल्याचे समोर आले.
याशिवाय जिल्हा परिषद, जुने कलेक्टर ऑफिस, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन व इतर शासकीय कार्यालयांकडे सुमारे 6 कोटी थकबाकी आहे. बंद पडलेल्या मोबाईल टॉवरकडे सुमारे 4 कोटी थकबाकी आहे.
शहरातील 16 हजार 524 व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे सुमारे सात कोटी रुपये थकीत आहेत, तर 33 हजार 407 मोकळ्या भूखंड धारकांकडे 12 कोटी रुपये थकबाकी आहे. एप्रिल ते ऑक्टोबरअखेर 35 कोटी रुपये वसुली झाली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात प्रभाग समिती एक व चार यांना प्रत्येकी 15 कोटी रुपये, प्रभाग समिती दोनला 10 कोटी, प्रभाग समिती तीनला 5 कोटी असे 45 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. वसुली न झाल्यास संबंधित अधिकारी व लिपिकांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. तसेच, ओपन प्लॉटधारकांनी व व्यावसायिक मालमत्ताधारकांनी एका महिन्यात पैसे न भरल्यास त्या प्लॉटचा किंवा व्यावसायिक मालमत्तेचा ताबा महापालिका कायदेशीररित्या घेणार असल्याचा इशारा प्रशासक डांगे यांनी दिला आहे.