नगर: जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून, जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील 34 गावे व 162 वाड्या-वस्त्यांमधील सुमारे 64 हजार 586 नागरिकांना 30 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखेमार्फत टंचाईग्रस्त भागांचे सूक्ष्म देखरेख करण्यात येत आहे. 29 एप्रिल 2026 रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 34 गावे व 162 वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 64 हजार 586 नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या भागांसाठी 30 टँकर (4 शासकीय व 26 खासगी) कार्यरत असून संगमनेर, पारनेर व नगर या तालुक्यांमध्ये टंचाईचे प्रमाण अधिक असल्याने तेथे अनुक्रमे 10, 13 व 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरच्या खेपांबाबतही समाधानकारक प्रगती नोंदविण्यात आली आहे. मंजूर 90. 92 खेपांपैकी 88 खेपा पूर्ण करण्यात आल्या असून हे प्रमाण सुमारे 96. 79 टक्के आहे. यामुळे टंचाईग्रस्त भागांमध्ये पाणी वेळेत पोहोचत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील 12 विहिरी व बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले असून त्यापैकी 3 जलस्त्रोत थेट गावांसाठी तर 9 टँकर भरण्यासाठी वापरण्यात येत आहेत. आवश्यकतेनुसार अतिरिक्त खाजगी जलस्त्रोत अधिग्रहित करण्याचे अधिकार संबंधित तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी आगाऊ कृती आराखडा तयार करण्यात आला असून टँकर प्रस्तावांना तात्काळ मंजुरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा व्यवस्थापनासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.
पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथके
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस व आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच, टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना गळती किंवा पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी विशेष भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.