नगर: महावितरणकडून ३३ के.व्ही. मुळा डॅम विद्युत वाहिनीच्या देखभाल-दुरुस्ती व उच्चदाब ग्राहकांची सीटी बदलण्याच्या कामासाठी शुक्रवारी (दि. २७) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. याच कालावधीत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामेही करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांतील पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.
शटडाऊन व दुरुस्तीच्या कामामुळे मुळानगर व विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असून, शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाहीत. तसेच, शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवून उपनगरातील ज्या भागांचे जास्त दिवसांचे रोटेशन आले आहे, अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
शुक्रवारी (दि. २७) पाणीपुरवठा : सकाळी ११ नंतर पाणी वाटप होणाऱ्या बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, मुकुंदनगर तसेच स्टेशन रोड, आगरकर मळा, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात भागांत पाणीपुरवठा होणार नाही. या भागांना शनिवारी (दि.२८) पाणीपुरवठा होणार आहे
शनिवारी (दि. २८) रोटेशननुसार पाणीपुरवठा होणाऱ्या मध्यवर्ती शहरातील मंगलगेट, रामचंद्रखुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी तसेच गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, टी.व्ही. सेंटर परिसर, म्युनिसीपल हडको, सारसनगर, बुरुडगाव रोड, बालिकाश्रम रोड आदी भागांतील पाणीपुरवठा रद्द करण्यात आला आहे. या भागात रविवारी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
रविवारी (दि. २९) रोटेशनुसार सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिस्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने महानगरपालिका कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी आदी भागांत पाणीपुरवठा होणार नसून, तेथे सोमवारी (दि. ३०) पाणीपुरवठा करण्यात येईल. शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.