Voter List Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Voter List Revision: अहिल्यानगरमध्ये आजपासून मतदारयादी विशेष पुनरीक्षण; गणना प्रपत्र भरल्याशिवाय नव्या यादीत नाव नाही

30 जूनपासून बीएलओंच्या घरोघरी भेटी; 5 ऑगस्टला प्रारूप मतदारयादी, 7 ऑक्टोबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यात मंगळवारपासून मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाव्‍दारे प्रत्येक पात्र मतदाराची नोंद अचूक व अद्ययावत केली जाणार आहे. त्‍यासाठी मंगळवारपासून (दि.३०) मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेटी देत मतदारांकडून गणना प्रपत्र भरुन घेणार आहेत. त्या आधारेच प्रारूप मतदारयादी तयार होणार आहे. गणना प्रपत्र भरुन दिले तरच मतदारांचे नाव नवीन मतदारयादीत समाविष्‍ट होणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सांगितले. त्‍यामुळे मतदारांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्‍या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. त्‍या पार्‍श्वीभूमीवर सोमवारी (दि.२९) जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार श्वेता संचेती आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्‍हणाले की, १ ऑक्टोबर २०२६ हा या पुनरीक्षणासाठी पात्रता दिनांक म्हणून निश्चित करण्यात आला आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी भेट देऊन त्यांना गणना प्रपत्राचे वितरण करतील. या प्रपत्रात मतदारांची वैयक्तिक माहिती व आवश्यक कागदपत्रांची नोंद घेण्यात येणार असून, त्या आधारेच प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. त्‍यामुळे नव्‍या मतदारयादीत नाव हवे असल्‍यास मतदारांनी गणना प्रपत्र भरुन देणे गरजेचे आहे.

त्‍यामुळे घरी आलेल्‍या बीएलओंना सहकार्य करुन गणना प्रपत्र भरुन देण्‍यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नागरिकांना केले आहे. या गणना प्रपत्राच्‍या आधारेच प्रारूप मतदारयादी तयार करुन ती ५ ऑगस्‍ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर ४ सप्‍टेंबरपर्यंत दावे व हरकती मागविण्‍यात येणार आहे. प्राप्‍त हरकती आणि दाव्‍यांवर सुनावणी होऊन ७ ऑक्‍टोंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्‍द केली जाणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी डॉ. आशिया यांनी सांगितले.

राजकीय पदाधिकार्‍यांची उदासीनता

मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाच्‍या पार्‍श्वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.२९) सर्व राजकीय पक्षांच्‍या पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. परंतु एकाही पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीकडे फिरकले नाहीत. प्रत्‍येक मतदान केंद्रांवर पक्षाच्‍या वतीने एक प्रतिनिधी (बीएलए) नियुक्‍त करण्‍याचे आवाहन केले. याकडेही राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्‍याचे दिसत आहे.

नगर शहरात फक्‍त ७१ टक्‍के मॅपिंग

जिल्ह्यातील ३८ लाख १० हजार १०२ मतदारांपैकी ३२ लाख ५० हजार ६९३ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले (८५.३२ टक्‍के) आहे. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी ७१.१९ टक्के तर अकोले विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९२.८४ टक्के मॅपिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांचे मॅपिंगही विहित कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT