

नगर: जिल्ह्यात अंमलपदार्थ आणि नशेखोरीला रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी मेगा ऑपरेशन राबविण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात एकाच दिवशी अचानक छापे घालून खुल्या मैदानात बसून गांजा ओढताना ६५ जणांना रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या मेगा ऑपरेशनमुळे अंमली पदार्थ विक्रेते व नशेबाजांचे धाबे दणाणले आहे.
अहिल्यानगर शहरात व जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी, निर्जन रस्ते, रेल्वे स्टेशन परिसर, कॉलेजच्या आजूबाजूचे परिसर आणि काही ढाब्यांच्या मागे अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना एकाच वेळी छापे घालण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकाने आणि विशेष पथकांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी केली. या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या ६५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर 'एनडीपीएस' (NDPS Act) आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्याकडून गांजा आणि तो ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
शहरातील तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. केवळ गांजा ओढणाऱ्यांवरच नाही, तर शहरात गांजा आणि इतर अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस अधीक्षक सुदर्शन यांनी दिला.
तोफखाना, श्रीगोंद्यात सर्वाधिक कारवाया
जिल्ह्यात सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत रस्त्यावर बसून अथवा शाळेच्या प्रांगणामध्ये गांजा ओढणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यात तोफखाना व श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी 11 ठिकाणी छापे घालून कारवाई करण्यात आली. त्या पाठोपाठ एमआयडीसी पोलिसांनी गांजा ओढणाऱ्या 7 जणांना पोलिसी खाक्या दाखविला.