voter list  pudhari photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Voter List: अहिल्यानगर जिल्ह्यात ५१ मतदान केंद्रांची वाढ; प्रारूप मतदारयादी २४ ऐवजी ३१ ऑगस्टला

एसआयआरअंतर्गत मतदान केंद्रांचे पुनर्रचना; ५७ केंद्रांचा प्रस्ताव, सहा केंद्रे समायोजित झाल्याने प्रत्यक्षात ५१ केंद्रांची भर

पुढारी वृत्तसेवा

नगर: निवडणूक विभागाच्‍या एसआयआर अंतर्गत मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण वा पुनर्रचना करण्‍यात आली आहे. जिल्ह्यासाठी आणखी ५७ नवीन मतदान केंद्रांचा प्रस्‍ताव निवडणूक आयोगाला पाठविण्‍यात आला आहे. सहा मतदान केंद्र पूर्णपणे लगतच्‍या मतदान केंद्रात समायोजित झाल्‍याने प्रत्‍यक्षात ५१ मतदान केंद्रांची वाढ अपेक्षित आहे. दरम्‍यान, २४ ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द होणारी प्रारुप मतदारयादी आता ३१ ऑगस्‍टला प्रसिध्‍द होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने २००२ मधील मतदारयादीचे सध्‍याच्‍या मतदारयादीशी मॅपिंग करुन नवीन बिनचूक मतदारयादी तयार करण्‍यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रबाबरोबरच मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण वा पुनर्रचना करण्‍याचे आदेश दिले होते. असंकलित मतदार वगळून जिल्‍हा प्रशासनाने १७ ऑगस्‍ट रोजीच उपलब्‍ध झालेले मतदार अर्ज डिजिटाईज्‍ड केले.

डिजिटाईज्‍ड झालेली प्रारुप मतदारयादी २४ ऑगस्‍ट रोजी प्रसिध्‍द करुन दावे व हरकती मागवून त्‍यानंतर २७ ऑक्‍टोबरपर्यंत अंतिम मतदारयादी प्रसिध्‍द करण्‍याचे आदेश दिले होते. मात्र, आयोगाने प्रारुप मतदारयादी प्रसिध्‍दी, दावे व हरकती स्‍वीकारणे आणि अंतिम मतदारयादी प्रसिध्‍दी आदी कार्यक्रमात बदल केला आहे. त्‍यानुसार या कार्यक्रमात बदल केला असून, आता ३१ ऑगस्‍ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिध्‍द होणार आहे.

दरम्‍यान, जिल्ह्यात ३ हजार ८३० मतदान केंद्र असून, आयोगाच्‍या आदेशानुसार या केंद्रांचे सुसुत्रिकरण करण्‍यात आले. २९ मतदान केंद्रांतील मतदारांचे समायोजन करण्‍यात आले. तसेच राहुरी विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित मतदारसंघांत मिळून ५७ नवीन मतदान केंद्र प्रस्‍तावित केले आहेत.

मात्र, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील एक, अहमदनगर शहर मतदारसंघातील दोन तसेच संगमनेर विधानसभा मतदारसंघातील तीन अशा सहा मतदान केंद्रांचे पूर्णपणे समायोजन झाल्‍याने प्रत्‍यक्षात ५१ मतदान केंद्रांची वाढ असणार आहे. त्‍यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्‍या ३ हजार ८८१ पोहोचणार आहे.

प्रस्‍तावित मतदान केंद्र संख्‍या

अकोले: २, संगमनेर ३, शिर्डी ४, कोपरगाव ५, श्रीरामपूर ३, नेवासा १२, शेवगाव ९, पारनेर ८, अहमदनगर शहर १, श्रीगोंदा २, कर्जत-जामखेड ८.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT