Ahilyanagar Theatre Complex Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Theatre Complex: नगरकरांचे नाट्यसंकुलाचे स्वप्न लवकरच साकारणार; काम ९५ टक्के पूर्ण!

१९ कोटींचा प्रकल्प अंतिम टप्प्यात; एक हजार आसनक्षमतेचे वातानुकूलित नाट्यगृह, सुरू होण्यासाठी आणखी सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. सूर्यकांत वरकड

नगर: तब्बल दहा वर्षांपासून नगरकर रसिकांच्या स्वप्नवत असलेल्या नाट्य संकुलाचे काम आता शेवटच्या टप्याकडे आले आहे. सावेडीतील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागील बाजुला नाट्य संकुल इमारतीचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. आता इंटेरिअर डिझाईन कामाची वर्क ऑर्डर झाली असून, लवकरच ते सुरू होणार आहे. मात्र, नाट्यकर्मींना हक्काच्या नाट्य गृहासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

अहिल्यानगर शहराला साहित्य आणि नाट्याची मोठी परंपरा आहे. आजमितीला नाट्य क्षेत्रातील राज्यस्तरीय स्पर्धा अहिल्यानगर शहरात होतात. नगरी मातीतील अनेक कलाकारांनी राज्य व देश पातळीवर कलेचा अमिट ठसा उमटविला आहे. त्यामुळेच शहरात हक्काचे नाट्य संकुल असावे, अशी अनेक दिवसांची नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकांची मागणी होती. शहरातील जिल्हा बँकेचे यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह, तलाठी संघटनेचे माऊली संकुल अशी दोनच नाट्यगृह आज उपलब्ध आहेत.

त्यामुळे नाट्यप्रेमींची अनेक वेळा कुचंबना होत होती. नाट्यप्रेमींच्या मागणीनंतर नाट्य संकुलाच्या उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेतला. त्यांच्याच पुढाकारातून पंधरा वर्षांपूर्वी शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकातील भूखंडावर नाट्यसंकुल उभारण्यास परवानगी मिळाली. सुरूवातीला पाचशे आसन क्षमता ठेवण्यात आली होती.

मात्र, मागणीनुसार त्यात वाढ करून आता १००० आसन क्षमता करण्यात आली आहे. २३ मार्च २०१० रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु, मध्यंतरी ठेकेदारांच्या तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले, नंतर सुरू झाले. नाट्य संकुलाचे सिव्हील वर्क ९५ टक्के पूर्ण झाले असून, आता फक्त इंटेरिअर डिझाईनच कामाची वर्क ऑडर झाली असून, लवकरच काम सुरू होणार आहे. असे असले तरी नगरकर रसिकांना आणखी सहा ते सात महिने नाट्य संकुल सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

प्रकल्पाचा खर्च गेला १९ कोटींवर

सुरूवातीला नाट्‌यसंकुलाचा प्रकल्प १२ कोटी ७४ लाखांचा होता. मात्र आता प्रकल्पाची किंमत १९ कोटी झाली आहे. आतापर्यंत शासन ६० लाख, महापालिका फंडातून १२ कोटी व आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून जिल्हा नियोजन समितीद्वारे ५ कोटी रुपये प्राप्त झाला आहे. आतापर्यंत उभारणीसाठी ७ कोटी रुपये खर्च झालेला आहे.

असे असेल नाट्य संकुल

प्रशस्त पार्किंगसह तळमजला व बाल्कनी फ्लोअर, संपूर्ण वातानुकूलित आसन क्षमता : १०००, तळमजल्यामध्ये १० बाय २० मीटर आकर्षक वुडन फ्लोअरिंग, प्रशस्त बॅकस्टेज, ग्रीन रूम, आकर्षक आसन व्यवस्था, अ‍ॅकोस्टिक इंटेरिअर, कॅफेटेरिया आता इंटेरिअर डिझाईनचे काम सुरू.

नाट्यकर्मी आणि नाट्य रसिकाच्या मागणीनुसार शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकानजीक नाट्य संकुल उभे राहण्यासाठी पाठपुरावा केला. रसिकांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप आले आहे. येत्या काही दिवसांत नाट्य संकुलाचे काम पूर्ण होत आहे. महापालिकेचे नाट्य संकुल नाट्यकर्मीसाठी पर्वणी ठरणार आहे.
आमदार संग्राम जगताप
गेल्या पंधरा वर्षांपासून नाट्य संकुलाचे काम सुरू आहे. वर्षभरापासून कामास गती मिळाल्याने सिव्हील वर्क पूर्ण झाले असून, केवळ अंतर्गत काम बाकी आहे. त्याचीही निविदा काढली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नाट्य संकुल नगरकरांच्या सेवेत दाखल होईल.
यशवंत डांगे, आयुक्त, अहिल्यानगर महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT