नगर: शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीमधील संभाव्य अनियमितता शोधण्यासाठी राज्यस्तरावर तपासणी सुरू असताना, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षण विभागाने दिलेल्या मान्यताही चर्चेत आल्या आहेत.
सन २०१२ ते २०१६ या कालावधीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या वैयक्तिक मान्यतांचे प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाने मागविले आहेत. प्राथमिकचे सुमारे २००, तर माध्यमिक शिक्षण विभागातील ८०० हून अधिक प्रस्तावांची तपासणी होणार आहे.
राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रणालीतील नोंदींच्या अनुषंगाने पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. शालार्थ प्रणालीतील कथित गैरप्रकारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडीसंबंधीचे आदेश आणि प्रत्यक्ष रुजू झाल्याचे अहवाल यांची पडताळणी केली जात आहे. नोव्हेंबर २०१२ ते नोव्हेंबर २०१६ या कालावधीतील नियुक्त्यांची कागदपत्रेही या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील संबंधित प्रस्ताव मागविण्यात आल्याने शिक्षण विभागातील जुन्या मान्यतांची छाननी महत्त्वाची ठरणार आहे.
कोणत्या बाबी तपासल्या जाणार?
वैयक्तिक मान्यता देताना संबंधित कर्मचाऱ्याची शैक्षणिक पात्रता, नियुक्तीची प्रक्रिया, मंजूर पदाची उपलब्धता आणि आवश्यक प्रशासकीय कागदपत्रे महत्त्वाची असतात. त्यामुळे तपासणीदरम्यान संस्थेचा ठराव, जाहिरात, निवड प्रक्रिया आणि नियुक्ती आदेश नियमानुसार आहेत का?, संबंधित शिक्षकाकडे नियुक्तीच्या वेळी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता होती का?, संबंधित पद मंजूर होते का? त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी आवश्यक परवानगी होती का?,
सक्षम अधिकाऱ्याने मान्यता दिली होती का? आदेशावरील क्रमांक, दिनांक आणि स्वाक्षरीची पडताळणी होते का?, नियुक्त शिक्षक प्रत्यक्ष शाळेत रुजू झाला होता का? त्याच्या उपस्थितीच्या नोंदी उपलब्ध आहेत का?, वैयक्तिक मान्यता आदेश आणि शालार्थ आयडीसंबंधीच्या नोंदींमध्ये सुसंगती आहे का?, मान्यतेनंतर संबंधित कर्मचाऱ्याचे वेतन कोणत्या आदेशाच्या आधारे सुरू झाले, याची पडताळणी होते का? शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियुक्तीचा ठराव, नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि संबंधित नोंदवह्यांची पडताळणी महत्त्वाची ठरणार असल्याचेही बोलले जाते.
नगरच्या प्रस्तावांच्या छाननीकडे असणार लक्ष
एसआयटीकडून संपूर्ण राज्यातच तपास सुरू आहे. नगरच्या प्रस्तावांची छाननी हाही त्याचाच एक भाग आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागातील मिळून सुमारे एक हजार प्रस्तावांची तपासणी होणार आहे. या प्रस्तावांमधील मान्यता आदेश, नियुक्तीची कागदपत्रे आणि संबंधित नोंदींची पडताळणी झाल्यानंतरच प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.